थेट पाईपलाईन योजनेत ६० कोटींचा दरोडा

By admin | Published: May 5, 2017 10:50 PM2017-05-05T22:50:44+5:302017-05-05T22:54:59+5:30

भाजप-ताराराणी आघाडीचा गंभीर आरोप दोन माजी मंत्र्यांसह चौघांची ‘नार्को टेस्ट’ घेण्याची मागणी

60 crore robbery in direct pipeline scheme | थेट पाईपलाईन योजनेत ६० कोटींचा दरोडा

थेट पाईपलाईन योजनेत ६० कोटींचा दरोडा

Next

कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेत दोन माजी मंत्री, ठेकेदार आणि कन्सल्टंट यांनी मिळून संगनमताने ६० कोटींचा दरोडा घातल्याचा आरोप करत या प्रकरणाचे सत्य बाहेर येण्याकरीता राज्य सरकारने चौघांचीही सर्वांची ‘नार्को टेस्ट’ करावी, अशी मागणी महानगरपालिकेतील भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी केली. शुक्रवारी दुपारी तीन वाजता माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांनी महानगरपालिकेतील ताराराणी सभागृहात आढावा बैठक घेतली. या बैठकीचे निमंत्रण नसलेल्या विरोधी पक्षनेते किरण शिराळे, भाजप गटनेते विजय सूर्यवंशी, ‘ताराराणी’चे गटनेते सत्यजित कदम, नगरसेवक सुनील कदम यांनी सायंकाळी साडेसात वाजता पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला. आरोप करताना थेट नावे न घेता केवळ ‘दोन माजी मंत्री’ असाच त्यांनी उल्लेख केला. दोन माजी मंत्र्यांना आजच महानगरपालिकेत येऊन बैठक घेण्याची वेळ का आली? असा सवाल करत सत्यजित कदम म्हणाले की, आपले अपयश कन्सल्टंटच्या माथ्यावर फोडण्यासाठी ही आढावा बैठक घेतली. चुकीच्या पद्धतीने अंदाजपत्रक झाले, चुकीच्या पद्धतीने त्याचे बिल अदा केले जात आहे, असे आम्ही सांगत होतो; तेच कन्सल्टंटने मान्य केले. मंत्री असताना त्यांनी योजनेचे अंदाजपत्रक का पाहिले नाही? ४२५ कोटींची योजना ४८८ कोटींवर गेलीच कशी? टेंडरमधील शर्ती का पाहिल्या नाहीत? गेल्या तीन वर्षांत एकदाही बैठक का घेतली नाही? योजनेतील त्रुटी आणि भ्रष्टाचार दाखविण्याचा आमच्याकडून प्रयत्न होताच आढावा बैठक घेणे म्हणजे एकूण भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्याचा प्रकार आहे. योजना मंजूर होतानाच थेट पाईपलाईनवर दरोडा घातला गेला, असा आरोप सुनील कदम यांनी केला. ते म्हणाले की, योजना अत्यंत पारदर्शकपणे पूर्ण व्हावी अशीच आमची भावना आहे. भ्रष्टाचार झालेल्या योजनेचे आम्हाला श्रेय घ्यायचे नाही. मात्र, योजनेत लूट झाली असल्यामुळे भाजप, ताराराणी आघाडी गप्प बसणार नाही. आयआरबीला आणून कोल्हापूरला बदनाम केले गेले. आताही थेट पाईपलाईन योजना आणून बदनाम केले जात आहे. ठेकेदाराला चुकीच्या प्रकारे जादा बिल अदा केले आहे, ही फसवणूक आहे. आयुक्तांनी आधी ते वसूल करावे आणि याला जबाबदार असलेल्या कन्सल्टंट व अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई झाली पाहिजे. योजनेत ज्यांनी पैसे खाल्ले तेच आजच्या आढावा बैठकीला आले. शहराला फसविण्याचे काम सुरू आहे. ज्यांनी लाल दिव्याच्या गाडीत बसून ‘आयआरबी’चा टोल दिला त्यांनी आम्हाला शिकवू नये. ज्यांनी चोर पकडून दिला त्यांनाच बैठकीला बोलाविले नाही, ही खेदाची बाब आहे. गेल्या महिन्याभरापासून आम्ही थेट पाईपलाईनवर चर्चा करण्याकरीता ‘विशेष सभा’ घ्या म्हणून विनंती करत आहोत; पण ती आयोजित केली जात नाही. विशेष सभा घेऊन कन्सल्टंट ठेकेदार यांना उपस्थित ठेवा त्यांना आम्ही काही प्रश्न विचारणार आहोत, असे आवाहन कदम यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: 60 crore robbery in direct pipeline scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.