कोरोना मृताच्या ६० वारसांना दोनदा मिळाली मदत, कोल्हापूर जिल्हा प्रशासनासमोर वसुलीची डोकेदुखी 

By इंदुमती सूर्यवंशी | Published: December 29, 2022 06:58 PM2022-12-29T18:58:37+5:302022-12-29T18:59:02+5:30

जे रक्कम परत करणार नाहीत त्यांच्यावर काय कारवाई करायची याचे स्पष्ट निर्देश नाहीत.

60 heirs of Corona deceased received help of 50 thousand twice in Kolhapur district | कोरोना मृताच्या ६० वारसांना दोनदा मिळाली मदत, कोल्हापूर जिल्हा प्रशासनासमोर वसुलीची डोकेदुखी 

कोरोना मृताच्या ६० वारसांना दोनदा मिळाली मदत, कोल्हापूर जिल्हा प्रशासनासमोर वसुलीची डोकेदुखी 

Next

इंदुमती गणेश

कोल्हापूर : खात्यावर ५० हजार रुपये येणे अपेक्षित असताना आले १ लाख रुपये.. मग काय आनंदी आनंद, डबल धमाका.. अशी स्थिती होईल की नाही. कोरोनाने मृत्यू झालेल्या एका व्यक्तीच्या दोन वारसांना किंवा एकालाच दोनवेळा ५० हजारांचे अर्थसाहाय्य मिळाल्याची ६० प्रकरणे जिल्ह्यात उघडकीस आली आहेत. या रकमेची परत वसुली करणे ही जिल्हा प्रशासनासाठी डोकेदुखी बनली आहे. यातील अनेकांनी प्रामाणिकपणे प्रशासनाला रक्कम परत केली आहे, तर काही जणांनी हात वर केले आहे.

कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसांना राज्य शासनाच्या वतीने ५० हजारांचे अर्थसाहाय्य केले जाते. त्यासाठी जिल्ह्यातून अंदाजे ७ हजारांवर वारस पात्र ठरले. त्यांच्या अर्जांची छाननी करून खात्यावर रक्कम वर्ग झाली; पण नंतर डेटा चेक करताना कळाले की, ६० मृतांच्या वारसांच्या खात्यावर रक्कम दोनदा गेली आहे.

राज्य शासनातील अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत त्यांनी जिल्हा प्रशासनाला दुसरी रक्कम वसूल करण्याचा आदेश दिला; पण लेखी काही आले नाही. जे रक्कम परत करणार नाहीत त्यांच्यावर काय कारवाई करायची याचे स्पष्ट निर्देश नाहीत. शेवटी प्रशासनाने सामंजस्याने पैसे वसूल करून घेण्याचा पर्याय अवलंबला.

नेमके करायचे काय...?

  • आर्थिक मदतीमुळे अनेक कुटुंबांमध्ये त्रांगडे होऊन बसले आहे. ही प्रकरणे इतकी कौटुंबिक आणि व्यक्तिगत स्वरूपाची आहेत की त्यावर नेमका निर्णय काय द्यायचा हेच कळेनासे झाले आहे.
  • निधन झालेल्या व्यक्तीस दोन पत्नी आहेत, एकीच्या खात्यावर रक्कम गेल्याने दुसरी भांडत आली. साहेब मीच नवऱ्याला अखेरपर्यंत सांभाळले तिला पैसे का दिले..?
  • मुलाच्या खात्यावर रक्कम वर्ग झाली, सावत्र आईने तक्रार केल्यावर मुलाने सांगितले, या आईने आमच्या कुटुंबाला, वडिलांना फार छळले, तिचा काही संबंध नाही. अर्धी रक्कमसुद्धा मी देणार नाही.
  • खात्यावर दोनदा आलेली रक्कम मुलाने खर्च केली आणि वसुलीसाठी फोन केल्यावर पैसे नाहीत मी काय करू, असा गयावया सुरू आहे.
  • वडिलांच्या मृत्यूचे पैसे पहिल्या पत्नीच्या खात्यावर आणि दुसऱ्या पत्नीच्या मुलाच्या खात्यावर अशा दोन ठिकाणी वर्ग झाली आहे. दोघांनाही प्रत्येकी २५ हजार परत करायला सांगितले; पण दोघेही हटायला तयार नाहीत.
  • गांधीनगरमधील एका महिलेला रक्कम दोनदा मिळाली. तिला आणि सवतीला दोघींनाही वसुलीचे फोन गेले. दुसरीला पैसे मिळाले नाहीत, आणि पहिली पैसे परत करेना.


कसबा बावड्यातील पठ्ठ्या भारीच निघाला..

एका वारसाने कसबा बावड्यातील संगणक व्यावसायिकाकडून अर्ज भरून घेतला. त्या पठ्ठ्याने बाकी माहिती बरोबर भरली; पण खाते नंबर आणि मोबाईल नंबर स्वत:चा अपलोड केला. रक्कम गेली त्याच्या खात्यावर. अर्ज करून तीन महिने झाले तरी पैसे मिळाले नाहीत म्हणून वारसाने जिल्हा आपत्तीकडे संपर्क साधला. छाननी केल्यानंतर व्यावसायिकाचा गोलमाल लक्षात आला. धाक दाखवल्यावर महिन्याची मुदत मागितली, आता तीन महिने झाले तरी पैसे परत केलेले नाहीत.

६ अर्जांवर एकाचेच खाते..

एका पक्षाचा कार्यकर्ता जिल्हा व महापालिका प्रशासनाकडे वारंवार विविध अर्जांचे काय झाले, याचा पाठपुरावा करण्यासाठी यायचा. अर्जांची छाननी सुरू असताना कळले की, याचा खाते क्रमांक आणि मोबाईल क्रमांक ६ जणांच्या अर्जावर आहे, त्याशिवाय त्याने संबंधितांकडून अर्ज भरण्याचे म्हणून प्रत्येकी हजार रुपये वसूल केले.

चांगुलपणा असाही..

६० पैकी २० हून अधिक लोकांनी वसुलीसाठी फोन जाण्याआधी स्वत:हून प्रामाणिकपणे जास्त आलेली रक्कम परत केली. २० जणांनी प्रशासनाचा फोन आला की तजवीज करून रक्कम भरली. उरलेल्या काही जणांनी तयारी दाखवली. मुलाची आठवण म्हणून एका कुटुंबाने मुलगा शिकलेल्या शाळेला देणगी दिली, अशा चांगल्या घटनाही यानिमित्ताने पुढे आल्या.
 

Web Title: 60 heirs of Corona deceased received help of 50 thousand twice in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.