राज्यात ६० लाख टन साखरेचे उत्पादन : उताऱ्यात कोल्हापूर विभाग आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 01:51 AM2019-01-24T01:51:29+5:302019-01-24T01:51:56+5:30
चालू गळीत हंगामात २० जानेवारीअखेर राज्यात ५६८ लाख ५७ हजार टन उसाचे गाळप झाले असून, ६० लाख ८२ हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गतवर्षी याचकाळात ते ५३ लाख १४ हजार टन इतके झाले होते. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.७० इतका, तर कोल्हापूर विभागाचा ११.८७ असून, उताºयात कोल्हापूर विभाग आघाडीवर आहे.
चंद्रकांत कित्तुरे ।
कोल्हापूर : चालू गळीत हंगामात २० जानेवारीअखेर राज्यात ५६८ लाख ५७ हजार टन उसाचे गाळप झाले असून, ६० लाख ८२ हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गतवर्षी याचकाळात ते ५३ लाख १४ हजार टन इतके झाले होते. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.७० इतका, तर कोल्हापूर विभागाचा ११.८७ असून, उताºयात कोल्हापूर विभाग आघाडीवर आहे.
राज्यात सध्या सहकारी १०० आणि खासगी ९१, असे १९१ साखर कारखाने सुरू आहेत. राज्यातील ७ विभागांपैकी पुणे विभागातील ६२ कारखान्यांनी २३२ लाख ६२ हजार टन उसाचे गाळप करून २४ लाख ४६ हजार टन साखरेचे उत्पादन केले आहे. या विभागाचा साखर उतारा १०.५२ टक्के आहे. त्या खालोखाल कोल्हापूर विभागात ३७ कारखाने सुरू असून, त्यांनी १२६ लाख ७९ हजार टन उसाचे गाळप करून १५ लाख ५४० हजार टन साखरेचे उत्पादन केले आहे.
राज्यात गेल्या हंगामात १०७.२३ लाख टन साखर उत्पादन झाले होते. यंदा त्यापेक्षाही जास्त होईल, असा सुरुवातीचा अंदाज होता; मात्र दुष्काळ आणि हुमणीमुळे उत्पादनात घट येऊन ९५ लाख टनांपर्यंत साखर उत्पादन होईल, असा सुधारित अंदाज व्यक्त करण्यात आला. इस्माने आपल्या दुसºया सुधारित अंदाजातही तोच कायम ठेवला आहे.
‘एफआरपी’चे तुकडे !
गाळप हंगाम सुरू होऊन तीन महिने होत आले तरी कोल्हापूर विभागात अद्याप एफआरपी एकरकमी द्यावयाची की, तिचे तुकडे करावयाचे हा वाद सुरू आहे. यामुळे काही कारखान्यांनी २३०० रुपये प्रतिटन शेतकºयांच्या खात्यावर जमा केले असले तरी एफआरपीचे तुकडे करण्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्याने कारखान्यांनी ऊस बिले शेतकºयांच्या खात्यावर जमा करणे बंद केले आहे. दोन हप्त्यात एफआरपीनुसार होणारी बिले द्यायची कारखान्यांची तयारी आहे. मात्र, ‘स्वाभिमानी’ने ती एकरकमीच जमा करावीत, अशी भूमिका घेतली आहे. यासाठी २८ जानेवारीला पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याची तयारी संघटनेने केली आहे. मात्र, परिस्थिती पाहता केंद्र सरकार तत्काळ मदत द्यायला तयार नाही. त्यामुळे एफआरपीचे तुकडे करूनच शेतकºयांच्या खात्यावर ऊस बिले जमा होतील, असे दिसते.
विभागनिहाय ऊस गाळप आणि साखर उत्पादन
विभाग कारखाने ऊस गाळप साखर उत्पादन उतारा (%)
कोल्हापूर ३७ १२६.७९ १५०.५४ ११.८७
पुणे ६२ २३२.६२ २४४.६२ १०.५२
अहमदनगर २८ ८४.९३ ८८.६६ १०.४४
औरंगाबाद २४ ५०.८४ ४८.९६ ९.६३
नांदेड ३४ ६८.८७ ७१.०९ १०.३२
अमरावती २ २.०० २.०५ १०.२५
नागपूर ४ २.५३ २.३५ ०९.२९
एकूण १९१ ५६८.५७ ६०८.२७ १०.७०
(ऊस गाळप लाख मे. टन तर साखर उत्पादन लाख क्विंटलमध्ये )