आरक्षण व प्रारुप प्रभाग रचनेवर ६० हरकती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:13 AM2021-01-08T05:13:13+5:302021-01-08T05:13:13+5:30
कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीकरिता राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तयार करण्यात आलेल्या प्रारुप प्रभाग रचना, तसेच प्रभाग आरक्षण यासंदर्भात आतापर्यंत ...
कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीकरिता राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तयार करण्यात आलेल्या प्रारुप प्रभाग रचना, तसेच प्रभाग आरक्षण यासंदर्भात आतापर्यंत एकूण ६० हरकती व सूचना प्रशासनास प्राप्त झाल्या. या सर्व हरकतींवर राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसमोर सुनावणी होणार असून, त्याची तारीख नंतर जाहीर केली जाणार असल्याचे महापालिका निवडणूक विभागाने सोमवारी सांगितले.
कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लवकरच होणार आहे. त्याकरिता निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार दि. २१ डिसेंबर रोजी सोडत पद्धतीने प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यानंतर २३ डिसेंबर रोजी प्रारुप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. प्रभाग आरक्षण काढत असताना शहरवासीयांनी विविध प्रश्न व शंका उपस्थित करून महापालिका अधिकारी व निवडणूक आयोगाचे अधिकारी यांना भंडावून सोडले होते. परंतु, ही आरक्षण टाकण्याची प्रक्रिया असल्याने त्यावर कोणती चर्चा करता येणार नाही असे सांगून त्यांनी हरकती देण्याचे आवाहन केले होते. हरकती सादर करण्याचा सोमवार शेवटचा दिवस होता.
शेवटच्या दिवसापर्यंत महापालिका प्रशासनाकडे आरक्षणाबाबत ३१, तर प्रारुप प्रभाग रचनेबाबत २९ अशा एकूण ६० हरकती, सूचना दाखल झाल्या आहेत. निवडणूक आरक्षण व प्रारुप प्रभाग रचना ही प्रक्रिया पारदर्शक व आयोगाच्या निकषानुसार असूनदेखील एवढ्या मोठ्या संख्येने हरकती दाखल झाल्याने त्यावर समोरासमोर बसून सुनावणी घ्यावी लागणार आहे. सुनावणीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. त्यामुळे ही तारीख नंतर जाहीर केली जाईल व तक्रारदारांच्या हरकतींवर सुनावणी घेतली जाईल, असे महापालिकेने म्हटले आहे.