अनाथ मुलांच्या खात्यावर ६ हजार प्रोत्साहन भत्ता जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:17 AM2021-06-29T04:17:25+5:302021-06-29T04:17:25+5:30
(राज्य पानांवर यावी) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शासकीय व अनुदानीत स्वयंसेवी निरीक्षगृहातून १८ वर्षे पूर्ण झाली म्हणून बाहेर ...
(राज्य पानांवर यावी)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शासकीय व अनुदानीत स्वयंसेवी निरीक्षगृहातून १८ वर्षे पूर्ण झाली म्हणून बाहेर पडलेल्या व अनुरक्षण गृहात दाखल झालेल्या राज्यभरातील २७९ तरुणांना प्रत्येकी दरमहा २ हजार रुपयांप्रमाणे तीन महिन्यांचा सहा हजार रुपये प्रोत्साहन भत्ता त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. यंदाच्या वर्षातील ही पहिलीच मदत असून, त्याबद्दल या मुलांकडून व संस्थांनीही महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांचे आभार व्यक्त केले आहेत.
या निर्णयानुसार २१ जिल्ह्यांतील निरीक्षणगृहातून बाहेर पडलेल्या १५५ तरुणांना तर, निवासी निरीक्षण गृहात दाखल १२४ तरुणांना ही मदत देण्यात आली आहे. महिला बालविकास विभागाच्या एकात्मिक बाल संरक्षण योजनेसाठी केंद्राकडून निधी दिला जातो. इतक्या वर्षांनी प्रथमच हे पैसे मुलांच्या खात्यावर थेट बँकेत जमा झाले आहेत. ही आनंदाची बाब असल्याची प्रतिक्रिया सनाथ वेल्फेअर फाउंडेशनच्या प्रमुख गायत्री पाठक-पटवर्धन यांनी व्यक्त केली आहे. हे पैसे दरवर्षीच १८ ते २१ वर्षांवरील राज्यातील सरसकट बालगृहातील मुला-मुलींना मिळणे आवश्यक आहे. अनुरक्षण गृहात न राहणाऱ्या अनाथ मुलांची संख्या जास्त आहे. त्या मुलांची परिस्थिती हलाखीची आहे. तसेही या योजनेद्वारे विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या कोणत्याही उपक्रमांमधून बालगृहातील १८ वर्षांवरील मुलांना थेट लाभ अद्यापपर्यंत झाला नाही. यावर्षी जसे थेट मुलांच्या अकाउंटवर पैसे जमा केले, तसेच हे पैसे दरवर्षी थेट मुलांच्या अकाउंटवर जाणे अत्यावश्यक आहे, अशी मागणी पाठक यांनी केली आहे.
राज्यातून प्रतिवर्षी सरासरी ५०० हून अधिक मुले बालगृहातून बाहेर पडतात. परंतु त्यातील फारशी अनुरक्षणगृहात राहत नाहीत. त्यामुळे त्यांचा शोध घेणे व त्यांना हा भत्ता देणे जिकिरीचे बनते. त्यामुळे सध्या जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी यांच्याकडे संपर्क असलेल्या मुलांनाच हा भत्ता मिळतो. संस्थेतून बाहेर पडल्यावर या मुलांची आर्थिक आबाळ होऊ नये असाही हा भत्ता देण्यामागील चांगला हेतू आहे.