कोल्हापूर बाजार समितीसाठी ६०९ जणांची माघार, १८ जागांसाठी ५१ रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 12:15 PM2023-04-21T12:15:05+5:302023-04-21T12:18:52+5:30
अडते-व्यापारी व हमाल-तोलाईदार गटात बहुरंगी तर इतर गटात सरळ लढत
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत गुरुवारी अखेरच्या दिवशी माघारीसाठी अक्षरश: झुंबड उडाली होती. एकूण ६६० पात्र अर्जांपैकी तब्बल ६०९ जणांनी माघार घेतली असून १८ जागांसाठी ५१ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. अडते-व्यापारी व हमाल-तोलाईदार गटात बहुरंगी तर इतर गटात सरळ लढत होत आहे.
सत्तारूढ आघाडीने बुधवारीच पॅनेलची घोषणा केल्याने त्यांच्याकडील इच्छुकांच्या गुरुवारी सकाळपासूनच निवडणूक कार्यालयाबाहेर माघारीसाठी रांगा लावल्या होत्या. विरोधी पॅनेलचा घोळ दुपारी दोनपर्यंत राहिल्याने अनेक जण थांबून होते. त्यांनी उमेदवार निश्चित केल्यानंतर माघारीसाठी पुन्हा गर्दी उसळली. तब्बल ६०९ जणांनी माघार घेतली.
असे राहिलेत उमेदवारी अर्ज, कंसात जागा :
विकास संस्था : सर्वसाधारण : १७ (७), महिला : ४ (२), इतर मागासवर्गीय : ३ (१), भटक्या विमुक्त जाती : २ (१)
ग्रामपंचायत : सर्वसाधारण : २ (५), अनुसूचित जाती : ३ (१), आर्थिक दुर्बल : २ (१).
अडते-व्यापारी : ८ (२)
हमाल तोलाईदार : ७ (१)
सत्तारूढ आघाडीचे उर्वरित उमेदवार जाहीर
अडते-व्यापारी : वैभव सावर्डेकर व कुमार आहुजा (दोघेही कोल्हापूर)
हमाल-तोलाईदार : दिलीप पोवार (कणेरी पैकी पोवारवाडी, पन्हाळा)
सत्तारूढला ‘कपबशी’, विरोधकांना ‘शिलाई मशीन’?
आज, शुक्रवारी चिन्हांचे वाटप केले जाणार असून सत्तारूढ आघाडीने ‘कपबशी’ तर विरोधकांनी शिलाई मशीन चिन्हाची मागणी केली आहे.
विरोधी ‘शिव-शाहू परिवर्तन’ आघाडीची मोट
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक, राजेश क्षीरसागर, सत्यजित पाटील-सरुडकर, चंद्रदीप नरके, संजय पवार, समरजीत घाटगे, राहुल देसाई, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर आदींच्या नेतृत्वाखालील विरोधी ‘शिव-शाहू शेतकरी परिवर्तन’ आघाडीची मोट बांधली आहे.
आघाडीने सर्वच्या सर्व १८ उमेदवार जाहीर केले आहेत. सर्व प्रमुखांना घेत बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न दोन्ही काँग्रेससह जनसुराज्य पक्षाच्या नेत्यांनी केला होता. मात्र त्याला खीळ बसली आहे. विरोधी पॅनलमध्ये दोन माजी संचालकांना संधी देण्यात आली आहे.
उमेदवार असे :
विकास संस्था : सर्वसाधारण - रणजित पाटील (चुये), बाजीराव पाटील (वडणगे), किरण पाटील(महे), सुरेश पोवार (सातार्डे), अर्जुन चौगुले (पोर्ले), प्रताप मेंगाणे (बामणे, भुदरगड), बळवंत पाटील (चंद्रे)
महिला : कविता शाहू चव्हाण (दऱ्याचे वडगाव) व अरुणा अशोक पाटील (पाडळी बुद्रूक).
इतर मागासवर्गीय : अनिल वायकुळ (आंबा)
भटक्या विमुक्त जाती : मधुकर पाटील (मोरेवाडी, भुदरगड)
ग्रामपंचायत गट :
सर्वसाधारण : संजय जाधव (हणमंतवाडी) व सुरेश पाटील (पिरळे, शाहूवाडी)
आर्थिक दुर्बल : समाधान म्हातुगडे (सोनाळी, कागल).
अनुसूचित जाती : उत्तम कांबळे (गोरंबे)
अडते - व्यापारी गट : नंदकुमार वळंजू व अमर क्षीरसागर (कोल्हापूर)
हमाल-तोलाईदार : राजाराम जगताप (कुराडवाडी, पन्हाळा)