बेळगावमध्ये ६२ लाखांची रोकड, ४ हजार लिटर दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:24 AM2021-04-11T04:24:32+5:302021-04-11T04:24:32+5:30
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसंदर्भातील अवैध आर्थिक व्यवहार आणि मद्य पुरवठ्यावर करडी नजर ठेवण्यात येत आहे. ठिकठिकाणच्या तपासणी नाक्यांवर आतापर्यंत एकूण ...
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसंदर्भातील अवैध आर्थिक व्यवहार आणि मद्य पुरवठ्यावर करडी नजर ठेवण्यात येत आहे. ठिकठिकाणच्या तपासणी नाक्यांवर आतापर्यंत एकूण ६२.५५ लाख रुपयांची रोकड जप्त केल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. हरीशकुमार यांनी दिली आहे.
जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या व्याप्तीत २७ तपासणी नाके (चेकपोस्ट) स्थापण्यात आले आहेत. या ठिकाणी निवडणुकीसंदर्भात वाहनांची तपासणी करताना आतापर्यंत एकूण ६२,५५,५१० रुपये सापडले आहेत. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पोलिसांसह इतर पथकांनी केलेल्या चौकशीअंती जप्त केलेल्या पैशांपैकी १९८३,८९० रुपये संबंधितांना परत करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे उर्वरित ४२,७१,६२० रुपयांची संशयास्पद रोकड नियमानुसार अधिक चौकशीसाठी संबंधित खात्याकडे सुपुर्द करण्यात आली आहे.
पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अबकारी खात्याने ११.२५ लाख रुपयांहून अधिक किमतीची ४,०२० लिटर अवैध दारू जप्त केली आहे. अबकारी खात्याने अवैध दारूसह १६ मोटरसायकल्स, १ कंटेनर, १ टँकर, ४ कारगाड्या आणि १ जीपगाडी हस्तगस्त केली आहे. या वाहनांची एकूण किंमत ४२.२६ लाख रुपये इतकी होते. निवडणूक कालावधीत अबकारी खात्याकडे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकूण १२८ प्रकरणे दाखल झाली आहेत.