अद्याप ६२ टक्के पूरबाधित ऊस शेतातच, कारखान्यांकडून थंडा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 05:12 PM2021-12-24T17:12:43+5:302021-12-24T17:28:52+5:30
अजूनही ११ हजार ६५३ हेक्टरवरील नदीकाठाला तोडीच्या प्रतीक्षेत आहे. केवळ ३८ टक्केच ऊस गाळपासाठी गेला असून ६२ टक्के ऊस शिवारातच आहे.
नसीम सनदी
कोल्हापूर : आधीच निसर्गाने मारले असल्याने सहानुभूती ठेवून साखर कारखान्यांनी पूरबाधित ऊस हंगामाच्या पहिल्या टप्प्यातच तोडून न्यावा असे सक्त आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी देऊन देखील त्याचा विसर पडल्यासारखीच जिल्ह्यातील परिस्थिती आहे. पुराचा सामना करावा लागणाऱ्या १९ कारखान्यांनी हंगाम सुरू झाल्याच्या या दोन महिन्यात १८ हजार ८७४ पैकी ७२२१ हेक्टवरीलच ऊस तोडला आहे. अजूनही ११ हजार ६५३ हेक्टरवरील नदीकाठाला तोडीच्या प्रतीक्षेत आहे. केवळ ३८ टक्केच ऊस गाळपासाठी गेला असून ६२ टक्के ऊस शिवारातच आहे.
ऊस ऐन वाढीच्या अवस्थेत असताना जुलैच्या शेवटच्या आठवड्यात आलेल्या महापुराने नदी-ओढ्याकाठच्या पिकाचे अतोनात नुकसान केले. निसर्गाच्या या अवकृपेमुळे ऊस उत्पादक सलग तिसऱ्या वर्षी मोडून वाढला. त्याला आधार देण्यासाठी म्हणून स्वत: जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी पुढाकार घेत पूरबाधित प्राधान्याने तोडावा असा आग्रह धरला. यासाठी प्रादेशिक साखर सहसंचालकांच्या नेतृत्वाखाली नियंत्रण समिती देखील नेमली. रोजच्या रोज आढावा घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
यासंदर्भात स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी तीनवेळा कारखाना प्रतिनिधींशी बैठक घेऊन त्यांना ६०: ४०या प्रमाणात तोडीचे नियोजन करण्यास सांगण्यात आले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही परिस्थितीत नोव्हेबर अखेरपर्यंत पूरबाधित ऊस तुटला पाहिजे असे सक्त आदेशही काढले, पण आता नोव्हेंबर संपण्यास आठ दिवसांचा कालावधी उरला असताना वस्तूस्थिती तपासली असता १९ कारखान्यांनी केवळ ३८ टक्केच ऊस तोडला असल्याचे निदर्शनास आले आहे.
खासदार मागे, मंत्री पुढे
- पूर बाधित ऊस तोडण्यामध्ये खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखालील मंडलिक कारखान्याने केवळ १४ टक्केच ऊस तोडला आहे.
- याउलट पालकमंत्री सतेज पाटील यांच्या डी.वाय कारखान्याने ५२ टक्के, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सरसेनापती कारखान्याने ६५ टक्के तर, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शरद कारखान्याने ५९ टक्के ऊस गाळप केला आहे.
उसाचे मग सरपणच..!
- नदीकाठचा ऊस गाळाने माखला आहे. त्याला आता किरळे फुटू लागली आहेत. गुंठ्याला १० मोळी देखील चांगला ऊस निघणार नाही
- आता तर उन्हाचा तडाखा जसा वाढेल तसे या उसाचे सरपणच होणार आहे. काडी लावून पेटवून देण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय राहणार नाही.
- आता हे क्षेत्र तुटले तर रान रिकामे करुन रब्बी पीक घेता येणे शक्य आहे.
टक्केवारी
राजाराम, कुंभी, गुरुदत्त, दत्त शिराेळ, शरद, दालमिया, दौलत, डी.वाय, जवाहर, बिद्री या कारखान्यांकडे एक हजार हेक्टरवरील पूरबाधित उसाची नाेद आहे. पण दालमियाचा ५८ टक्के, डी.वाय ५२, बिद्री ४८ टक्केचा अपवाद वगळता उर्वरित कारखान्यांची टक्केवारी ४० टक्क्यांच्या आतच आहे.
कारखानानिहाय पूर बाधित ऊस (हेक्टरमध्ये )
कारखाना | पूर बाधित नोंद | तुटलेले क्षेत्र | टक्केवारी | शिल्लक ऊस |
वारणा | ५८४ | १९५ | ३३ | ३८९ |
पंचगंगा | ७९४ | १२२ | १५ | ६७१ |
कुंभी | १६३८ | ४६१ | २८ | ११७७ |
बिद्री | १००८ | ४८५ | ४८ | ५२३ |
भोगावती | ८१९ | १५९ | १९ | ६६० |
दत्त | २३२१ | ८४४ | ३६ | १४७६ |
शाहू | ८१६ | १७८ | २१ | ६३८ |
जवाहर | १२४८ | ३९७ | ३१ | ८५१ |
राजाराम | १७७१ | ५१० | २८ | १२६१ |
आजरा | ५५ | ४४ | ८० | ११ |
मंडलिक | ४६३ | ६५ | १४ | ३९७ |
शरद | १४४८ | ८६३ | ५९ | ५८५ |
डी.वाय | १०५९ | ५५२ | ५२ | ५०६ |
अथणी | ६१ | ४५ | ७२ | १६ |
दालमिया | १२११ | ७०७ | ५८ | ५०३ |
गुरुदत्त | १५२२ | ३९३ | २५ | ११२८ |
इको केन | ६९ | ५० | ७२ | १९ |
ओलम | ४४७ | ४१९ | ९३ | २७ |
सेनापती | ३६५ | २४० | ६५ | १२५ |