उपचार थांबविलेल्या ४९० एचआयव्ही संसर्गित रुग्णांपैकी ६३ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 10:55 AM2019-03-27T10:55:33+5:302019-03-27T11:07:13+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील एडस्वरील उपचार थांबविलेल्या ४९० एचआयव्ही संसर्गित रुग्णांपैकी ६३ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक यांच्या वतीने दीड महिन्याच्या सर्वेक्षणातून ही आकडेवारी समोर आली असून, यातील तब्बल १७९ जणांचे पत्ते चुकीचे असल्याचेही निष्पन्न झाले आहे. असे असले तरी जिल्ह्यातील १२२०० जण नियमित उपचाराव्दारे आरोग्यपूर्ण जीवन जगत आहेत, हेदेखील यानिमित्ताने लक्षात घ्यायला हवे.
समीर देशपांडे
कोल्हापूर : जिल्ह्यातील एडस्वरील उपचार थांबविलेल्या ४९० एचआयव्ही संसर्गित रुग्णांपैकी ६३ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक यांच्या वतीने दीड महिन्याच्या सर्वेक्षणातून ही आकडेवारी समोर आली असून, यातील तब्बल १७९ जणांचे पत्ते चुकीचे असल्याचेही निष्पन्न झाले आहे. असे असले तरी जिल्ह्यातील १२२०० जण नियमित उपचाराव्दारे आरोग्यपूर्ण जीवन जगत आहेत, हेदेखील यानिमित्ताने लक्षात घ्यायला हवे.
या जिल्हास्तरीय संस्थेने गेली काही वर्षे किर्लोस्कर आॅईल इंजिन्स यांच्या सामाजिक बांधीलकी उपक्रमांतर्गत मिळालेल्या अर्थसाहाय्यातून विविध मोहिमा हाती घेतल्या होत्या.
यंदा ‘संवेदना शोध मोहीम २०१९’अंतर्गत १ डिसेंबर २०१८ ते १५ जानेवारी २०१९ या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये एकात्मिक समुपदेशन चाचणी केंद्राच्या ४८ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील ४९० एडस्विषयक उपचार थांबविलेल्या रुग्णांची प्रत्यक्ष भेट घेण्याचा युद्धपातळीवरील कार्यक्रम हाती घेण्यात आला.
या कर्मचाऱ्यांनी आपले नियमित कामकाज सांभाळून जिल्ह्यासह अगदी शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यांतील वाड्या-वस्त्यांवर जाऊन, शहरातील झोपडपट्ट्यांमधून फिरून हे सर्वेक्षण केले आहे. या ४९० जणांचे सर्वेक्षण केले असता ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यातील चक्क ६३ जणांचे निधन झाले असून, १७९ जणांचे पत्ते चुकीचे निघाले आहेत.
४३ जणांनी शासकीय रुग्णालयात उपचारास नकार दिला आहे. बहुधा ते खासगी उपचार घेत असावेत; तर ३८ जणांनी पुन्हा उपचार सुरू करण्याची खात्री दिली आहे. २२ जणांनी प्रत्यक्ष उपचार सुरू केले असून, ९३ जण नोंदणी केलेल्या ठिकाणाहून औषधे न घेता इतर ठिकाणाहून घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ५२ जणांनी स्थलांतर केले आहे, तर १५ जणांचा संपर्क होऊ शकलेला नाही.
उपचार थांबविण्याची कारणे
- सामाजिक परिस्थितीमुळे रुग्णांना संकोच वाटतो.
- उपचारासाठी येण्याजाण्याचा प्रवास खर्च परवडत नाही.
- औषधांचे काही साईड इफेक्ट होतात.
आता एड्स रुग्णाविषयीचा समाजाचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. अजूनही समाजाने अशांना आधार देण्याची गरज आहे. त्यातूनच त्यांचा संकोच कमी होईल. आता उपचारासाठी येण्याजाण्याचा खर्चही देण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. तसेच औषधांचे साईड इफेक्ट होण्याचे प्रमाण आता कमी झाले आहे. एक-दोन आठवडे असा परिणाम राहतो. औषधे बदलूनही देता येतात. या सर्व बाबींचा विचार केला तर रुग्णांसमोर उपचार थांबविणे हा पर्यायच असता कामा नये. जिल्ह्यातील १२२०० नागरिक आरोग्यपूर्ण जीवन जगत आहेत. त्यामुळे यापुढील काळात अशा रुग्णांनी उपचार थांबवू नयेत.
- दीपा शिपूरकर
जिल्हा कार्यक्रम अधिकारी, (एडस्), कोल्हापूर