प्रयाग चिखली सोसायटीत ६४ लाखांचा अपहार
By Admin | Published: March 3, 2017 12:59 AM2017-03-03T00:59:34+5:302017-03-03T00:59:34+5:30
गुन्हा दाखल करण्याचे आदेश : अध्यक्ष, सचिव, विभागप्रमुख जबाबदार
विश्वास पाटील ---कोल्हापूर --प्रयाग चिखली (ता. करवीर) येथील प्रयाग चिखली सेवा संस्थेत अध्यक्षांसह सतरा संचालक, विभागप्रमुख आणि सचिवाने ६४ लाख १२ हजार १४९ रुपयांचा अपहार केल्याचे लेखापरीक्षण अहवालात स्पष्ट झाले आहे.
पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश साहाय्यक निबंधकांनी लेखापरीक्षक ए. डी. माने यांना दिले आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी गुन्हा दाखल होऊन संबंधितांना अटक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या संस्थेचे २०१४-१५ चे लेखापरीक्षण ए. डी. माने यांनी केले आहे. त्यामध्ये हा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी हा अहवाल जिल्हा विशेष लेखापरीक्षकांना दिला. त्यांनी सरकारी वकिलांचा अभिप्राय घेऊन पुढील कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार सहायक निबंधकांनी ३० जानेवारी २०१६ ला लेखापरीक्षक माने यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते; परंतु तोपर्यंत संस्थेने विभागीय सहनिबंधकांकडे पुनर्निरीक्षण अर्ज केला. त्याची दखल घेऊन त्यांनी विशेष लेखापरीक्षकांकडे पुन्हा हा अर्ज पाठविला. त्यांनी सहायक निबंधकांना पुढील कारवाई करावी, असे सुचविले. त्यानुसार माने यांना गुन्हा दाखल करण्याच्या सूचना २० फेब्रुवारी २०१७ ला दिल्या आहेत; परंतु जिल्हा परिषदेची निवडणूक होती व गावची यात्रा असल्याने गुन्हा नोंद केला नव्हता. ही कारवाई आज, शुक्रवारी होण्याची शक्यता आहे.
अपहारास जबाबदार असणाऱ्या व्यक्ती
संपत दत्तात्रय दळवी (अध्यक्ष), कुंडलिक वसंत झिरंगे (विभागप्रमुख), विलास बाबूराव माने (सचिव, रा. वडणगे), संचालक : रघुनाथ गणपती पाटील, शिवाजी दत्तात्रय कवठेकर, उत्तम बळवंत चौगले, संभाजी रंगराव पाटील, प्रभाकर हंबीरराव पाटील, शहाजी दगडू पाटील, बळवंत आनंदा कळके, देवबा दिनकर पाटील, दगडू रामचंद्र चौगले, बाबूसिंग रामसिंग रजपूत, निवृत्ती ज्ञानदेव पाटील, आवबा हिवराप्पा माने, दिलीप नामदेव लोहार, रामचंद्र सुबराव कांबळे, विजयमाला दिनकर मांगलेकर, श्रीमती रुक्मिणी पांडुरंग पाटील.
नावाजलेली संस्था : राजकीय स्पर्धेतून अनेक गावांत चार-चार सोसायट्या झाल्या; परंतु या गावात मात्र ही एकमेव सोसायटी असून, त्यावर ग्रामस्थांचा मोठा विश्वास होता. सोसायटीचे दोन ट्रॅक्टर आहेत. एक जीप आहे. कमी दराने शेतीची नांगरट करून दिली जाते. वर्षभर पुरेल इतके धान्य सोसायटी सभासदांना उधारीवर देते. अडीअडचणीला मदत करते; परंतु अडत विभागप्रमुख कुंडलिक झिरंगे व सचिव विलास माने यांनीच हा अपहार केल्याचा काही संचालकांचा आरोप आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य एस. आर. पाटील अडत विभागप्रमुख असताना त्यांनी जेवढ्या काळजीपूर्वक लक्ष द्यायला हवे होते, ते न दिल्याने या लोकांचे फावले; परंतु त्याची शिक्षा आता सगळ्यांनाच भोगावी लागणार आहे. हा मूळ अपहार एक कोटी ३३ लाख रुपयांचा असल्याची चर्चा गावात अनेक दिवसांपासून आहे; परंतु त्याची रक्कम कमी कशी झाली, हेदेखील कोडेच आहे.
चार गोष्टींत अपहार
१) रोख शिल्लक : सेवा सोसायटीतील तब्बल ४७ लाख रुपये उचल केली आहे. ती कशासाठी केली, कुणाला दिली याच्या नोंदी आढळून येत नाहीत.
२) गूळ उचल : सोसायटीने सभासदांना १५ लाख रुपये गूळ उचलीपोटी दिले आहेत; परंतु त्यांच्या नोंदी संशयास्पद.
३) मेंबर ठेव : सोसायटीच्या सदस्य ठेवीचा लाख रुपयांचा मेळ लागत नाही.
४) हमालीतही डल्ला : सोसायटीने ३० हजार रुपये हमालीपोटी दिले आहेत; परंतु ही रक्कम नक्की कुणाला दिली, त्यांनी कोणता माल आणला व आवक केल्याची नोंद नाही.
च्सहकार विभागाने या संस्थेची कलम ८८ अन्वयेही नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी चौकशी अधिकारी म्हणून राधानगरीचे सहायक निबंधक संभाजी पाटील यांची नियुक्ती केली आहे. त्याबद्दलही चौकशी सुरू झाली आहे.