विभागात ६४ लाख टन उसाचे गाळप

By admin | Published: December 22, 2016 12:07 AM2016-12-22T00:07:36+5:302016-12-22T00:07:36+5:30

गाळपात वारणा पुढे : सरासरी उताऱ्यात ‘गुरुदत्त’ची आघाडी

64 lakh tonnes of sugarcane crush in the division | विभागात ६४ लाख टन उसाचे गाळप

विभागात ६४ लाख टन उसाचे गाळप

Next

प्रकाश पाटील-- कोपार्डे -कोल्हापूर विभागातील (कोल्हापूर-सांगली) ३६ साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला वेग आला असून, केवळ दीड महिन्यात ६३ लाख ५३ हजार १०३ मे. टन. उसाचे गाळप झाले आहे. सरासरी ११.३१ च्या साखर उताऱ्याने ७१ लाख ८२ हजार ५८२ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. गाळप विभागात वारणा साखर कारखान्याने आघाडी घेऊन ४ लाख ७४ हजार ८०० मे. टन उसाचे गाळप केले आहे. तर गुरुदत्त टाकळी कारखान्याने सरासरी साखर उतारा १२.१५ टक्के मिळवत आघाडी घेतली आहे.
या हंगामात एफआरपी + १७५ या ऊसदराचा तोडगा निघाल्याने ५ नोव्हेंबरलाच कारखान्यांचे हंगाम सुरू झाले आहेत. मागील वर्षी दुष्काळाच्या झळा जाणवू लागताच शेतीसाठी पाणी उपसाबंदी कोल्हापूर जिल्ह्यात करण्यात आली. यामुळे पाण्याअभावी ऊस पिकांना मोठा फटका बसला. यावर्षी उसाच्या हेक्टरी उत्पादनात ३५ ते ४० टक्के घट दिसून येत आहे. ऊस तोडणी करत असताना उत्पादनातील घट स्पष्ट झाली असून, हेक्टरी ६० ते ७० टनापर्यंत उत्पादनात घट झाली असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. यावर्षी साखर कारखान्यांना आपले गाळप उद्दिष्ट गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार असून, हंगाम सुरुवातीपासूनच सर्वच कारखान्यांनी एकमेकांच्या कार्यक्षेत्रात घुसखोरी करून उसाची पळवापळवी सुरू केली आहे. उसाच्या उत्पादन घटीमुळे साखर कारखान्यांचे हंगाम ८० ते ९० दिवसच चालणार आहेत. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून बहुतांश साखर कारखान्यांची धुराडी बंद होणार आहेत.
यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यात २३ पैकी २१ कारखान्यांचे गाळप हंगाम जोमात सुरू असून ४० ते ४५ दिवसांत ४४ लाख ३० हजार ३१५ मे. टन उसाचे गाळप झाले आहे. यात वारणा साखर कारखान्याने ४ लाख ७४ हजार ८०० मे. टन उसाचे गाळप करून गाळपात आघाडी घेतली आहे. तर जवाहर साखर कारखान्याने ४ लाख २५ हजार ३०० मे. टन उसाचे गाळप करत द्वितीय, तर दालमिया शुगर्सने २ लाख ९९ हजार ६८० मे. टन उसाचे गाळप करत तिसऱ्या स्थानावर आहे. सरासरी साखर उताऱ्यातही कोल्हापूर जिल्ह्यातील गुरुदत्त १२.२५ टक्केच्या सरासरी साखर उताऱ्यासह प्रथमस्थानी असून, १२.२ टक्केच्या सरासरी उताऱ्यासह दुसऱ्या तर ११.७१ टक्के उतारा मिळवत बिद्री तिसऱ्या स्थानावर आहे.
सांगली जिल्ह्यातील १८ पैकी १५ साखर कारखान्यांनी आपले गाळप हंगाम सुरु केले आहेत. सांगलीतील कारखान्यांनी १९ लाख २२ हजार ७८८ मे. टन उसाचे गाळप करत ११.१२ च्या सरासरी साखर उताऱ्याने ७१ लाख ८२ हजार ५८२ क्विंटल साखर उत्पादन केले आहे. यात क्रांती कुंडल साखर कारखान्याने सर्वाधिक २ लाख ३६ हजार ९०० मे.टन ऊस गाळप केले आहे.
यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यात १ कोटी ४० लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध राहील तर सांगली
जिल्ह्यात ३५ लाख मे. टन उसाचे गाळप होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.


१९ डिसेंबर २०१६ पर्यंतचे गाळप
कोल्हापूर जिल्हासांगली जिल्हा
एकूण कारखाने२३१७
चालू कारखाने२१ ०३
बंद कारखाने२१५

Web Title: 64 lakh tonnes of sugarcane crush in the division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.