‘लेझर शो’च्या प्रेमात पडाल तर डोळ्यांचे विकार ओढवाल; कोल्हापुरात ६५ जणांना फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 02:01 PM2022-09-15T14:01:28+5:302022-09-15T14:01:54+5:30
थेट लेझरची किरणे पडली तर कायमस्वरूपी दिसणे बंद होण्याचा धोका
कोल्हापूर : गेल्या तीन वर्षांनी कोल्हापुरात यंदा धडाक्यात गणेशोत्सव साजरा झाला. सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत साऊंड सिस्टीमच्या जोडीला ‘लेझर शो’ होता. त्याचे प्रमाण अधिक होते. या लेझर शोने मात्र डोळ्यांना विविध विकारांचा त्रास सुरू झाला आहे. शहरातील सीपीआरसह अन्य खासगी रुग्णालयांमध्ये सुमारे ६५ रुग्ण डोळ्यांच्या विकारांवर उपचार घेत आहेत. त्यावर नेत्रपटल आणि नेत्ररोग तज्ज्ञांनी नागरिक आणि तरुणाईला ‘लेझर शो’ न पाहिलेलाच बरा, असा सल्ला दिला आहे.
डोळ्यातील मध्यभागी असणारा पडदा सर्वात संवेदनशील भाग असतो. त्यावर थेट लेझरची किरणे पडली तर कायमस्वरूपी दिसणे बंद होण्याचा धोका असतो. त्यामुळे लेझर हे डोळ्यासाठी चांगले नाही. शासनाच्या नियमानुसार व्यक्तीच्या डोक्याच्या आठ फुटांवर लेझर फोकस करायचा आहे. लेझरची किरणे डोळ्यापर्यंत पोहोचताच कामा नयेत. लेझरपासून दूर राहायला हवे. ते बघता कामा नये, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
‘लेझर शो’चे धोके काय?
- डोळ्यांच्या बाह्य बाजूला सौम्य स्वरूपाची इजा होऊ शकते. त्यामध्ये डोळे लाल होणे, चरचरणे, पाणी येणे आदी लक्षणांचा समावेश आहे.
- डोळ्यात मागच्या बाजूला जो पडदा असतो ज्याला रेटिना म्हटले जाते. त्यावरील नाजूक रक्त वाहिन्यांवर लेझर थेटपणे पडल्यास या रक्त वाहिन्या फुगतात आणि त्यातून रक्तस्त्राव होतो.
- मध्य बिंदूच्या आसपास जर रक्तस्त्राव झाला तर दिसणे कमी होते. मध्य बिंदूच्या पेशींवर आघात होऊन त्या कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे डोळ्यांसमोर वर्तुळाकार दिसणे किंवा काळे डाग दिसणे असे बराच काळासाठी होऊ शकते.
शक्यतो दूर राहावे
शक्यतो पाच मिनी व्होल्टपर्यंतचा लेझर शो असेल तर त्याचा फारकाही त्रास जाणवत नाही. त्यापेक्षा जास्त व्होल्ट झाल्यास ते डोळ्यांवर आघात करू शकते. त्यामुळे शक्यतो लेझर शो न पाहिलेला बरा आहे. त्याच्यासमोर येणे टाळावे. त्यापासून दूर राहावे.
सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर डोळ्यांच्या त्रासावर उपचार घेण्यासाठी आतापर्यंत आमच्याकडे चार रुग्ण आले आहेत. त्यांनी डोळ्यांसमोर वर्तुळे, काळे डाग दिसत असल्याचे सांगितले. दोन रुग्णांना रेटिना तज्ज्ञांकडे पाठविले असता, त्यांच्या डोळ्यामध्ये रक्तस्त्राव झाल्याचे आढळून आले. त्यामुळे लेझर शो पाहणे शक्यतो नागरिकांनी टाळावे. काही कारणास्तव पाहावा लागला आणि काही त्रास जाणवू लागला तर लगेच डॉक्टरांचा सल्ला, उपचार घ्यावा. -डॉ. अभिजीत ढवळे, नेत्ररोग तज्ज्ञ, सीपीआर रुग्णालय
लेझर शोमुळे डोळ्यात जळजळ होणे, डोळ्यांच्या बाजूला रक्तस्त्राव होणे आणि सर्वांत महत्त्वाचे मागच्या पडद्यामध्ये रक्तस्त्राव झाल्याचे प्रकार बऱ्याच जणांबाबत घडले आहे. त्यांना दिसणे कमी झाले आहे. साऊंड सिस्टीममुळे त्रास झाल्याचे रुग्ण यापूर्वी आमच्याकडे येत होते. यंदा लेझर शोमुळे त्रास होणारे रुग्ण पहिल्यांदाच आले आहेत. - डॉ. गिरीष गद्रे, नेत्रपटल तज्ज्ञ