दाजीपूरला ६५ टक्के पर्यटकांची भेट

By admin | Published: January 18, 2016 12:21 AM2016-01-18T00:21:07+5:302016-01-18T00:29:11+5:30

दोन महिन्यांतील चित्र : गतवर्षीच्या तुलनेत ६० टक्के पर्यटक शुल्क जमा

65 percent of tourists visit to Dazipur | दाजीपूरला ६५ टक्के पर्यटकांची भेट

दाजीपूरला ६५ टक्के पर्यटकांची भेट

Next

राधानगरी : दाजीपूर अभयारण्यात यावर्षी पहिल्या दोन महिन्यांतच गतवर्षीच्या तुलनेत ६५ टक्के पर्यटकांनी भेट दिली, तर ६० टक्के प्रवेश शुल्क जमा झाले आहे. १ नोव्हेंबर ते ३१ मे या सात महिन्यांसाठी हे अभयारण्य पर्यटकांसाठी खुले असते. पर्यटकांसाठी सुविधांमध्ये काही प्रमाणात झालेली सुधारणा व मागील दोन महिन्यांतील दिवाळी, नाताळ अशा सलग सुट्यांमुळे ही वाढ झाल्याचे दिसते.
विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, फुलपाखरे, दुर्मीळ वनस्पती यामुळे जागतिक वारसा स्थळ असा समावेश, पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील अशी झालेली नोंद यामुळे वन्यप्रेमींसह वन्यजीव व पर्यावरण अभ्यासकांसह सर्वसामान्यांनाही या अभयारण्याबाबत कुतूहल आहे. प्रसारमाध्यमातून होणारी प्रसिद्धी तसेच येथील वनसंपदेच्या माहितीची काही दिवसांपूर्वी इंटरनेटवरून सोशल मीडियावर चित्रफीत प्रसिद्ध झाली होती त्याचाही परिणाम झाला आहे.
वन्यजीव विभागाने ओलवन येथे परिस्थितीकीय विकास समिती स्थापन करून या कामात स्थानिकांना सहभागी करून घेतले आहे. त्यांच्या माध्यमातून ठक्याचावाडा येथे तंबू निवास, उपहारगृह सुरू केले आहे. निवासासाठी दोनजणांना एक हजार व चारजणांना एकहजार चारशे रुपये घेतले जातात. माळेवाडी येथील जलाशयात सहा आसन क्षमतेची साधी बोट आहे. तेथे जल विहार करता येतो, हौसी पर्यटकांना गिअरच्या नऊ सायकली तासी वीस रुपये भाड्याने मिळतात. वन विभागाच्या व खासगी निवासस्थानीही उपलब्ध आहे. खासगी हॉटेल झाल्याने जेवणाची सोय आहे.
वनविभाग पर्यटकांकडून प्रवेश कर म्हणून मोठ्यांना तीस, लहान मुलांना पंधरा, मोटारसायकल पंचवीस, जीप शंभर व बसला एकशे पन्नास रुपये घेतो. गतवर्षी सात महिन्यांत ७,३५१ पर्यटकांकडून तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये उत्पन्न मिळाले होते.
यावर्षी नोव्हेंबर, डिसेंबर या दोन महिन्यांत ४,७९९ पर्यटक आले. त्यातून दोन लाख सहा हजार पाचशे साठ रुपये व तंबू निवासातून समितीला तब्बल ४६ हजार उत्पन्न मिळाले आहे. (प्रतिनिधी)


विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, फुलपाखरे, दुर्मीळ वनस्पती यामुळे दाजीपूर अभयारण्याचा जागतिक वारसा स्थळ म्हणून पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील अशी झालेली नोंद
प्रवेश करापोटी प्रौढांकडून ३० रुपये, लहान मुलांना १५, दुचाकीसाठी २५, जीपला १०० रुपये, तर बसला १५० रुपये आकारले जातात.
माळेवाडी जलाशयात जलविहारासाठी सहा आसन क्षमतेची साधी बोट.
हौसी पर्यटकांना गिअरच्या नऊ सायकली तासी २० रुपये भाड्याने उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

Web Title: 65 percent of tourists visit to Dazipur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.