जिल्ह्यात ६६ गावे डोंगरकड्यांखाली

By admin | Published: June 5, 2015 12:07 AM2015-06-05T00:07:31+5:302015-06-05T00:14:06+5:30

लोकवस्ती धोक्यात : आणखी एक ‘माळीण’ होण्याची भीती

66 villages under the district | जिल्ह्यात ६६ गावे डोंगरकड्यांखाली

जिल्ह्यात ६६ गावे डोंगरकड्यांखाली

Next

कोल्हापूर : आपल्या आजूबाजूला किती धोके असतात, याची कल्पना आपणाला एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच समजते. गतवर्षी डोंगर कोसळल्यामुळे माळीण गाव अक्षरश: ‘होत्याचं नव्हतं’ झालं; परंतु अशा प्रकारचा धोका पुन्हा उद्भवू शकतो, अशी कोल्हापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांत तब्बल ६६ गावे आहेत. डोंगरकड्यांखाली वास्तव्य असलेल्या धोकादायक गावांचे सर्वेक्षण झालेले असले तरी हा धोका किती तीव्र स्वरूपाचा आहे, याचा अभ्यास करण्यात आलेला नाही.
गतवर्षी पुणे जिल्ह्यात प्रचंड पाऊस झाल्यानंतर डोंगर कोसळून संपूर्ण माळीण गाव गाडले गेले, मोठी जीवितहानी झाली. या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. त्यानंतर डोंगरकड्यांखाली धोकादायक स्थितीत असणाऱ्या गावांचा शोध घ्या आणि पर्यायी व्यवस्था करा, असे आदेश मंत्रालय पातळीवर झाले. त्यानुसार कोल्हापुरात तत्कालीन जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी तालुकास्तरावर तहसीलदारांना सूचना देऊन कोल्हापूर जिल्ह्यात अशी डोंगरकड्यांखाली वास्तव्य असलेली गावे, वाड्यांचे सर्वेक्षण करण्यास सांगितले होते.
प्रत्येक तालुक्यात तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडल निरीक्षक, तलाठी या सर्वांनी प्रत्येक गावात जाऊन डोंगरकड्यांच्या खाली असलेल्या गावांचा सर्व्हे केला. त्यांना दिलेल्या सूचनेनुसार जे गाव डोंगरकड्याखाली दिसते, त्याची त्यांनी दखल घेतली. त्यांची मोजदाद करून आकडेवारी आपल्या अहवालासह जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून दिली. सोबत त्यांनी घरांची संख्या, कुटुंबांची संख्या, लोकसंख्या, पशुपक्ष्यांची संख्या यांचीही मोजदाद केली आहे; परंतु, गावे डोंगरकड्याखाली असूनही त्यांना धोका कसा व किती तीव्र स्वरूपाचा आहे, याचा अभ्यास करण्यात आलेला नाही. राधानगरी तालुक्यात सर्वाधिक ५५ गावे धोकादायक ठिकाणी वसली आहेत.
जिल्ह्यात जी ६६ गावे डोंगरकड्यांखाली वसलेली आहेत, ती डोंगरकड्याची जमीन कशी आहे हे ठरविण्याइतपत तहसीलदार दर्जाचे किंवा महसूल विभागाचे अधिकारी वा कर्मचारी तज्ज्ञ नाहीत. त्यामुळे गावांचे सर्वेक्षण झाले असले तरी त्या गावांच्या धोक्याचे अनुमान काढण्यात आलेले नाही. कागल, शिरोळ, करवीर, हातकणंगले, चंदगड, गगनबावडा, आजरा या तालुक्यांमध्ये भूस्खलनाची अजिबात शक्यता नाही. मात्र, पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यातील प्रत्येकी एक, भुदरगड तालुक्यातील चिंचेवाडी गाव सामानगडाच्या पायथ्याशी असून, या तालुक्यात आठ गावे, तर राधानगरी तालुक्यातील सर्वाधिक ५५ गावे धोकादायक स्थितीत आहेत.
जिल्ह्यात डोंगरपायथ्याशी व डोंगरकड्याखाली वास्तव्यास असणाऱ्या ४६ हजार ४०७ लोकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर ६६ गावे धोक्याच्या पातळीत असतील तर प्रत्यक्ष त्यांचा धोका किती तीव्र स्वरूपाचा आहे, याचा अभ्यास करून तातडीने पर्यायी व्यवस्था, उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे; परंतु गेल्या वर्षभरात नेमक्या याच गोष्टीकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले आहे.
धोकादायक गावांचे सर्वेक्षण झाले; परंतु त्यांच्यावरील धोक्याची तीव्रता स्पष्ट न झाल्याने या सर्व गावांतील ग्रामस्थ आपला जीव डोंगरकड्यांच्या हवाली करूनच आजही जीवन जगत आहेत. लवकरच पावसाळा सुरू होत आहे. त्यामुळे डोंगरकड्यांचाही तातडीने तज्ज्ञांकडून अभ्यास करून ग्रामस्थांना योग्य त्या सूचना दिल्या गेल्या तर संभाव्य दुर्घटना आणि त्यामध्ये होणारी जीवितहानी टाळली जाऊ शकते.

धोकादायक गावे
तालुकागावेघरांची संख्या
१. राधानगरी५५१०,२८३
२. पन्हाळा१उपलब्ध नाही
३. शाहूवाडी१०८
४. भुदरगड८३६३
५. गडहिंग्लज१२२५

Web Title: 66 villages under the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.