ऊस क्षेत्रात ६७ हजार हेक्टरनी घट
By admin | Published: August 4, 2015 12:32 AM2015-08-04T00:32:10+5:302015-08-04T00:32:10+5:30
आयुक्तालयाचा अंदाज : राज्यातील परिस्थिती : कोल्हापूर विभागात मात्र ८,४२६ हेक्टरची वाढ
प्रकाश पाटील ल्ल कोपार्डे राज्यातील साखर कारखान्यांच्या येत्या २०१५-१६ च्या गळीत हंगामासाठी नऊ लाख ८६ हजार ३५३ हेक्टर एवढे क्षेत्र गाळपासाठी निश्चित करण्यात आले आहे. त्यातून सुमारे आठ कोटी ८७ लाख ७२ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप होण्याचा अंदाज साखर आयुक्तालयाकडून व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यात उसाच्या क्षेत्रात ६७ हजार ४५७ हेक्टरने घट झाली असली, तरी कोल्हापूर विभागात आठ हजार ४२६ हेक्टरनी वाढ झाली आहे.
यंदा साखर कारखान्यांच्या गळीत हंगामासाठी कोल्हापूर विभागातून दोन लाख ३० हजार ६०२ हेक्टर क्षेत्रातून दोन कोटी २५ लाख ८५ हजार मेट्रिक टन ऊस उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. विभागात यंदा उसाच्या क्षेत्रात मागील वर्षी तुलनेत आठ हजार ४२६ हेक्टरनी वाढ झाली आहे. पुणे विभागात तीन लाख ६७ हजार ८१ हेक्टर क्षेत्रामधून तीन कोटी ४६ लाख ९३ मेट्रिक टन ऊस उपलब्ध होण्याचा अंदाज आहे, परंतु या विभागात गेल्या वर्षीच्या तुलनेत उसाच्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक म्हणजे ३६ हजार २६२ हेक्टरने घट झाली आहे. नगर विभागातून एक लाख ३१ हजार ३७३ हेक्टर क्षेत्रातून एक कोटी ९ लाख ९५ हजार, औरंगाबाद विभागातून एक लाख ३ हजार ६३२ हेक्टरमधून ७४ लाख २८ हजार मेट्रिक टन, नांदेड विभागातून एक लाख २६ हजार ६२९ हेक्टर क्षेत्रातून ८८ लाख १७ हजार मेट्रिक टन, अमरावती विभागातून तीन हजार ७९ हेक्टर क्षेत्रातून दोन लाख ३ हजार मेट्रिक टन, तर नागपूर विभागातून १२ हजार ९२७ हेक्टर क्षेत्रातून सात लाख ५८ हजार मेट्रिक टन ऊस उपलब्ध होण्याचा अंदाज आहे.
जिल्हानिहाय उसाचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)
कंसात गाळपासाठी उपलब्ध होणारा ऊस (लाख टनांत) :
कोल्हापूर - १,४५,२८६ (१३६.५७), सांगली - ८३,९६६ (२२५.८५), सातारा - ६५,५०४ (६४.८५), पुणे - १,१८,४३० (११७.२५), सोलापूर - १,८३,१४७ (१६४.८३), नगर - १,१२,४१५ (९६.६८), नाशिक - १८,९५८ (१३.२७), धुळे - २,०६० (१.४४), नंदुरबार - १४,१२३ (११.१६), जळगाव - ९,९७४ (६.८८), औरंगाबाद - १५,३०६ (११.९४), जालना - २६,०९६ (१९.०५), बीड - ३६,०७३ (२३.८१),परभणी - २८,४८१ (२०.२२), हिंगोली - १५,१९१ (१०.१८), नांदेड - १८,७९२ (१२.५९), उस्मानाबाद - ४१,४७८ (२८.६२), लातूर - ४१,४७८ (२८.६२), बुलडाणा - ३४२ (०.१५), अकोला - १००, वाशिम - २०९ (०.११), अमरावती - ३२१ (०.२०), यवतमाळ - १३,५७९ (८.९६), वर्धा - ३०७९ (२.०३), नागपूर - ४,३६२ (२.४०), भंडारा - ४,३६१ (२.४४), गोंदिया - ९५५ (०.६०), चंद्रपूर १०२ (०.०६), गडचिरोली - ६८ (०.०४), सिंधुदुर्ग - १,३५० (१.१२).