गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयात ५ वर्षात ६७७७ प्रसुती, मानसेवी डॉक्टरांची कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 03:03 PM2020-07-23T15:03:18+5:302020-07-23T15:06:57+5:30

स्त्रीरोगतज्ज्ञाची जागा रिक्त असतानाही गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयात गेल्या ५ वर्षात सुमारे ६७७७ स्त्रियांची प्रसुती झाली. यावरून सर्वसामान्य महिलांचा भरवसा शंभर खाटांच्या सरकारी दवाखान्यावरच असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नाममात्र मानधनावर सेवा बजावणाऱ्या मानसेवी स्त्रीरोगतज्ज्ञांचे कौतुकच करायला हवे.

6777 deliveries in 5 years in Gadhinglaj sub-district hospital! | गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयात ५ वर्षात ६७७७ प्रसुती, मानसेवी डॉक्टरांची कामगिरी

उपजिल्हा रूग्णालय गडहिंग्लज

googlenewsNext
ठळक मुद्देगडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयात ५ वर्षात ६७७७ प्रसुती, मानसेवी डॉक्टरांची कामगिरी स्त्रीरोगतज्ज्ञ नसतानाही महिलांचा भरवसा शंभर खाटावरच

राम मगदूम

गडहिंग्लज : स्त्रीरोगतज्ज्ञाची जागा रिक्त असतानाही गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयात गेल्या ५ वर्षात सुमारे ६७७७ स्त्रियांची प्रसुती झाली. यावरून सर्वसामान्य महिलांचा भरवसा शंभर खाटांच्या सरकारी दवाखान्यावरच असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नाममात्र मानधनावर सेवा बजावणाऱ्या मानसेवी स्त्रीरोगतज्ज्ञांचे कौतुकच करायला हवे.

२००५ मध्ये बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रयत्नाने या रूग्णालयाची उभारणी झाली. त्यामुळे गडहिंग्लज, आजरा, चंदगड, भुदरगड व कागलसह सीमाभागातील गोरगरीब रूग्णांची, विशेषत: स्त्रियांची मोठी सोय झाली. परंतु, येथील फिजिशियनची जागा गेल्या ११ वर्षापासून तर स्त्रीरोगतज्ज्ञाची जागा ५ वर्षांपासून रिक्त आहे. अनेकवेळा मागणी करूनदेखील या महत्वाच्या दोन्ही जागा अद्याप भरलेल्या नाहीत.

डॉक्टर नसल्यामुळे महिलांची गैरसोय होवू नये, म्हणून परिसरातील स्त्रीरोगतज्ज्ञांना विनंती करावी आणि इच्छुकांना त्यांच्या सोयीनुसार व रूग्णालयाच्या गरजेनुसार बाह्य रूग्ण तपासणी व प्रसुतीकरिता पाचारण करण्यात यावे, अशी सूचना लोकप्रतिनिधींनी केली. तेंव्हापासून मानसेवी डॉक्टरांवरच स्त्रीरूग्ण विभागाचा डोलारा आहे.

दरम्यान, लहानसहान कारणावरून कितीही तक्रारी झाल्या तरी याठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांची आणि प्रसुतीकरिता हक्काने येणाऱ्या स्त्रियांची संख्यादेखील कमी झालेली नाही. त्यामुळे रूग्णालयावरील गरीबांच्या विश्वासाला तडा जाणार नाही, याची काळजी सातत्याने घ्यायला हवी.

 आकडे बोलतात..!

गेल्या ५ वर्षात ३५७२ महिलांची नैसर्गिक प्रसुती तर ३२०५ महिलांची सिजेरियन प्रसुती झाली आहे. डॉ. गॉडद यांनी १४८८ तर डॉ. देशमाने यांनी १३२५ सिजेरियन आणि दोघांनी मिळून ३२० इतर मोठ्या शस्त्रक्रिया केल्या आहेत.

रिक्त पदे भरा

फिजिशियन आणि स्त्रीरोगतज्ज्ञासह रूग्णालयातील रिक्त जागा तातडीने भरण्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील व प्रकाश आबीटकर यांनी नेटाने प्रयत्न करावेत. तसेच कामकाजासंदर्भात मार्गदर्शनासाठी वेळोवेळी संयुक्त बैठकादेखील घ्याव्यात.

खच्चीकरण नको !

मानसेवी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. बर्नाडेट गॉडद व डॉ. ब्रम्हनाथ देशमाने हे दोघेही आजऱ्याचेच आहेत. गेल्या ५ वर्षातील त्यांचे काम आणि आजरा तालुक्यातून प्रसुतीसाठी आलेल्या महिलांची संख्या विचारात घेतल्यास त्यांच्याकडून आजरा तालुक्यातील महिलांची हेळसांड झाली असेल असे वाटत नाही. त्यामुळे किमान त्यांचे मानसिक खच्चीकरण होणार नाही याचे भान संबंधितांनी ठेवायला हवे.





 

Web Title: 6777 deliveries in 5 years in Gadhinglaj sub-district hospital!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.