कोल्हापूर जिल्ह्यात पाच वर्षांत ६८२ बालमृत्यू -: परंपरा, अज्ञानाचा पगडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 01:05 AM2019-07-04T01:05:36+5:302019-07-04T01:06:14+5:30
जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत शून्य ते पाच वर्षे वयोगटांतील ६८२ बालमृत्यू झाले आहेत. त्यांतील ९० टक्के बालमृत्यू हे बालकांचे संगोपन, आरोग्यासंबंधीच्या रूढी-परंपरा, गैरसमज आणि अज्ञानामुळे झाले
इंदुमती गणेश ।
कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत शून्य ते पाच वर्षे वयोगटांतील ६८२ बालमृत्यू झाले आहेत. त्यांतील ९० टक्के बालमृत्यू हे बालकांचे संगोपन, आरोग्यासंबंधीच्या रूढी-परंपरा, गैरसमज आणि अज्ञानामुळे झाले आहेत. उर्वरित १० टक्के बालकांमध्ये जन्मत:च दोष आढळून आले आहेत.
अर्भक मृत्यूदर कमी करण्यासाठी शासनपातळीवर वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबविल्या जात आहेत. विदर्भ, मराठवाड्यात अनेक बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू होतो. मात्र सधन-समृद्ध कोल्हापुरात बालसंगोपनाविषयी चालत आलेल्या रूढी-परंपरा, अंधश्रद्धा, बालकांच्या आरोग्याविषयी असलेल्या अज्ञानामुळे होणाऱ्या बालमृत्यूंचे प्रमाण जास्त आहे. देशातील राज्यांचा विचार करता उत्तरप्रदेश, राजस्थान, बिहार या राज्यांमध्ये बालमृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. महाराष्ट्राचा बालमृत्यू दर १९ टक्के, तर कोल्हापूरचा ११ टक्क्यांवर आहे.
बालमृत्यूदर गेल्या सात-आठ वर्षांच्या तुलनेत कमी असला तरी त्याच्या सामाजिक कारणांबाबत फारशी चर्चा होत नाही. बाळ जन्मल्यानंतर त्याची वाढ आईचे दूध आणि स्पर्शातून मिळणारी ऊब यांमुळे होते. मात्र, अनेकदा बाळ दूध पीत नाही, आजारी आहे, या कारणांमुळे गाई-म्हशीचे, शेळीचे दूध त्याला दिले जाते. पाळणा, झोळी व तत्सम गोष्टींमुळे बाळ स्तनपानाव्यतिरिक्त मातेजवळ फारसे नसल्याने त्याला आईची ऊब मिळत नाही. बाळ आजारी पडले की घरगुती उपायांवर भर दिला जातो. सोबत गंडे-दोरे, भोंदूबाबा, कुणीतरी सुचविलेले अघोरी उपाय केले जातात. बाळाची प्रकृती खूप खालावली की मग दवाखान्याचा विचार केला जातो.
अनेकदा कौटुंबिक, आर्थिक अडचणी, गांभीर्याचा अभाव, कुटुंबातील वयस्कर व्यक्तींच्या विचारांचा पगडा, निर्णयाला विलंब, स्थानिक पातळीवर तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव, वेळेत व योग्य उपचार न मिळणे, १०८ अॅम्ब्युलन्स वेळेत न मिळणे, नर्स अथवा आरोग्य कर्मचाऱ्यांना उपचारांची माहिती नसणे या त्रुटीही बालमृत्यूला जबाबदार ठरतात.
निदान : करण्यात येतात अडथळे
अनेकदा स्वस्थ आणि हसत-खेळत असलेले बाळ अचानक किरकोळ कारणाने दगावते. रात्री निवांत झोपेच्या कुशीत गेलेले बाळ सकाळी निपचित असते. अशावेळी तात्पुरत्या स्वरूपात समोर दिसतील किंवा वाटतील ती कारणे सांगितली जातात; पण बाळ नेमके कशामुळे दगावले हे कळण्यासाठी त्याचे शवविच्छेदन होणे गरजेचे असते. मात्र, बाळासोबत प्रत्येकाचीच नाळ इतकी जोडलली असले की शवविच्छेदन होत नाही; त्यामुळे बाळ दगावण्यामागची नेमकी कारणमीमांसा करता येत नाही.
प्रतिबंध, जागृती हाच उपाय : जन्मत: अर्भकामध्ये दोष असेल तर बालमृत्यू टाळणे अवघड असते. मात्र हे प्रमाण नगण्य असते. उलट चुकीच्या पद्धतीने होणारे संगोपन आणि गैरसमज हे महत्त्वाचे कारण आहे. यात ‘आशा’ व अंगणवाडी सेविकांची महत्त्वाची भूमिका आहे.
माता व बालकांसाठी राबविलेल्या योजना
जननी सुरक्षा योजना
जननी शिशू सुरक्षा
प्रधानमंत्री मातृवंदना योजना
मातृत्व अभियान
ग्रामभारत विकास केंद्र
कोल्हापुरातील बालमृत्यूदर गेल्या दोन वर्षांत काहीअंशी कमी झाला असला तरी तो समाधानकारक आहे, असे म्हणता येणार नाही. तो कमी करण्यासाठी आम्ही कुटुंबातील वयस्कर व्यक्ती व मातेच्या प्रबोधनावर भर दिला आहे. कोल्हापुरातील बालमृत्युदर
११ टक्क्यांवरून केरळप्रमाणे १० टक्क्यांच्या आत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- डॉ. योगेश साळे (जिल्हा आरोग्याधिकारी)