कोल्हापूर जिल्ह्यात ६८६ संस्था अवसायनात निघणार, सहकार विभागाचे अंतरिम आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 06:34 PM2022-12-28T18:34:46+5:302022-12-28T18:35:10+5:30
राजाराम लोंढे कोल्हापूर : सहकार विभागाने कामकाज बंद असलेल्या संस्थांचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील विविध प्रकारातील ...
राजाराम लोंढे
कोल्हापूर : सहकार विभागाने कामकाज बंद असलेल्या संस्थांचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील विविध प्रकारातील २२०० संस्थांचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले असून, यातील ६७२ संस्थांना अंतरिम नोटीस बजावली आहे. तर गगनबावडा तालुक्यातील १४ संस्थांना अंतिम नोटीस बजावण्यात आली असून, या सगळ्या संस्था अवसायनात काढल्या जाणार आहेत.
जिल्हा बँक व ‘गोकुळ’ दूध संघ निवडणुकीत मतदानासाठी गावपातळीवर संस्था काढल्या होत्या. पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक सहकारी संस्था या कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. त्यातही विकास संस्था व दूध संस्थांची संख्या सर्वाधिक आहे. पिशव्यातील (नुसत्या कागदोपत्री) संस्थांमुळे संख्या फुगते, परिणामी सहकार विभागावर त्यांच्या कामाचा ताण येतो. यासाठी २०१४ ला तत्कालीन सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहकार शुद्धीकरणाची मोहीम हातात घेतली होती. त्यावेळी हजारो संस्था अवसायनात निघाल्या होत्या.
त्यानंतर राज्य सरकारने पुन्हा ही शुद्धीकरण मोहीम हातात घेतली. ऑक्टोबरमध्ये सहकार विभागाने सर्व्हेशनाचा व जिल्हा निबंधक कार्यालयाला कालबद्ध कार्यक्रम तयार करून दिला. त्यानुसार गेली अडीच महिने सहकार विभागाचे काम सुरू होते. दुग्ध व इतर संस्था अशा २२०० संस्थांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. या संस्थांची जागेवर जाऊन माहिती घेण्यात आल्या. यामध्ये दुग्धच्या ३२५ संस्था तर इतर ३४७ संस्थांना अंतरिम नोटिसा काढल्या आहेत. सहकार विभागाने २१ डिसेंबर २०२२ पर्यंत अवसायनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.
मात्र, ग्रामपंचायतीसह काही सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने विलंब झाला आहे. येत्या आठ दिवसांत अंतरिम नोटिसा काढलेल्या संस्थांकडे पाठपुरावा करून अंतिम नोटिसा लागू केल्या जातील. तसा अहवाल सहकार विभागाकडे पाठवावा लागणार आहे.
पन्हाळ्यातील सर्वाधिक १०४ संस्था
अंतरिम नोटिसा बजावलेल्या संस्थांमध्ये पन्हाळा तालुक्यातील तब्बल १०४ संस्थांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ हातकणंगले, भूदरगड, गडहिंग्लज, कागल व कोल्हापूर शहराचा क्रमांक लागतो. संस्था जास्त असणाऱ्या करवीर तालुक्यातील केवळ पाच संस्थांना नोटिसा लागू केल्या आहेत.
हुंबऱ्याला पुढारी अन्....
ग्रामीण भागात सहकारी संस्थांवरच गावातील राजकारण अवलंबून असते. त्यामुळे लहान गावात तर हुंबऱ्याला पुढारी अन् तांब्याला दूध संस्था पाहावयास मिळतात.
१३४ संस्थांचा पत्ताच सापडेना
संस्थांचे सर्वेक्षण करताना काही संस्था बंद असल्याचे निदर्शनास आले. मात्र, १३४ संस्थांचा ठावठिकाणाच सापडत नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.
अंतरिम नोटिसा काढलेल्या संस्था (दुग्ध वगळून)-
तालुका - संस्था
गडहिंग्लज - ३३
आजरा - ०३
भूदरगड - ३५
चंदगड - २०
शाहूवाडी - ०३
राधानगरी - १४
पन्हाळा - १०४
करवीर - ०५
हातकणंगले - ५६
शिरोळ - १६
कागल - १९
कोल्हापूर शहर - २५