Kolhapur- धक्कादायक!, खेळात हरला म्हणून सहावीतील मुलाने संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 12:20 PM2024-04-20T12:20:16+5:302024-04-20T12:20:16+5:30
इतर मुलांनी चिडविल्याने नाराज झाला
हुपरी (जि.कोल्हापूर) : मुलांसोबत खेळत असताना झालेला पराभव सहन न झाल्याने रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील लक्ष्मीनगर वसाहतीतील १२ वर्षांच्या मुलाने छपराच्या लोखंडी अँगलला टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केली. यश ऊर्फ गुंड्या नामदेव राठोड (वय १२) असे त्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. त्याने नुकतीच इयत्ता सहावीची परीक्षा दिली आहे. त्याचे आईवडील दगडखाणीवर दगड फोडणे, वाहतूक करणे व चहाटपरी चालविण्याचे काम करतात.
रेंदाळ येथील लक्ष्मीनगर वसाहतीनजीकच्या माळरानावर क्रशर आहेत. या क्रशरसाठी खाणीत दगड फोडणे व त्याची वाहतूक करण्याचे काम कर्नाटकातील लमाण समाजातील कुटुंबे करीत असतात. ही कुटुंबे या क्रशर परिसरातील पत्र्याच्या शेडमध्येच वास्तव्यास असतात. सध्या परीक्षा संपल्या असल्याने शाळा या सकाळीच भरतात. त्यानंतर दुपारच्या वेळेत सर्व मुले विविध प्रकारचे खेळ व स्पर्धा खेळत असतात. शांतीकुमार पाटील यांच्या क्रशरवरील मुले नेहमीप्रमाणे काचाकवड्याचा खेळ खेळत होते.
या खेळात यश हा हरला होता. त्याला इतर मुलांनी चिडविल्याने नाराज झाला होता. त्याचे वडील ट्रॅक्टर घेऊन पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत कामासाठी गेले होते. आई व थोरला भाऊ जवाहर साखर कारखान्यावरील चहाटपरीवर गेले होते. त्यामुळे घरी कोणीही नसल्याचे पाहून यशने आपल्या छपराच्या लोखंडी अँगलला टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केली.