प्रकल्पग्रस्तांना सात कोटी ३० लाखांचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:32 AM2020-12-30T04:32:19+5:302020-12-30T04:32:19+5:30
गारगोटी, भुदरगड तालुक्यातील पडखंबे येथे दहा वर्षांपूर्वी ल. पा. प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. परंतु प्रकल्पातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई ...
गारगोटी,
भुदरगड तालुक्यातील पडखंबे येथे दहा वर्षांपूर्वी ल. पा. प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. परंतु प्रकल्पातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई न मिळाल्याने तो निधी प्रलंबित राहिला होता; पण आमदार प्रकाश आबिटकर यांनी पाठपुरावा करून राज्य शासनाकडून खास बाब म्हणून ७ कोटी ३० रुपयांचा निधी मंजूर करून आणला असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली.
पडखंबे ल. पा. तलाव हा सुमारे गेल्या १० ते १५ वर्षांपासून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी बुडीत होण्याच्या भरपाईसाठी प्रलंबित होता. हा प्रकल्प २०१३ मध्ये रद्द करण्याची शिफारस जलसंधारण महामंडळाकडे करण्यात आली होती. परंतु आमदार प्रकाश आबिटकर यांनी २०१४ मध्ये पडखंबेसह प्रंचक्रोशीसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या या प्रकल्पास रद्द ‘न’ करता सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करून तत्कालीन जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याकडे वेळोवेळी घेतलेल्या बैठका व केलेल्या पाठपुराव्यामुळे या प्रकल्पास १४ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. परंतु प्रकल्पाचे काम सुरू करण्यामध्ये प्रमुख अडसर असणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या बाधित होणाऱ्या जमिनींकरिता मोबदला मिळणे गरजेचे आवश्यक होते. याबाबत नुकसानभरपाईसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. यानुसार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम महाराष्ट्रतील आमदारांच्या झालेल्या बैठकीमध्ये आमदार आबिटकर यांनी पडखंबे प्रकल्पातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली होती. या मागणीनुसार मुख्यमंत्री ठाकरे यांनी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांना निर्देश दिले. यानुसार जलसंधारण मंत्री गडाख यांनी शेतकऱ्यांना जमिनींच्या नुकसानभरपाईपोटी ७ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर केला. यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या या धरणास खऱ्याअर्थाने गती मिळाली आहे. पडखंबेसह न्हाव्याचीवाडी, वरपेवाडी, शेळोली परिसरातील शेकडो एकर जमिनी ओलिताखाली येणार आहेत.