कोल्हापूर जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे ७ कोटी कमिशन थकीत; १० दिवसांचा दिला वेळ, अन्यथा..
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 17:05 IST2025-03-20T17:05:04+5:302025-03-20T17:05:20+5:30
चार महिन्यांपासून प्रतीक्षा

कोल्हापूर जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे ७ कोटी कमिशन थकीत; १० दिवसांचा दिला वेळ, अन्यथा..
कोल्हापूर : लाडकी बहीण आणि निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या विविध योजनांचा मोठा फटका अन्य विभागांप्रमाणेच स्वस्त धान्य दुकानदारांनाही बसला आहे. गेल्या चार महिन्यांपासून शासनाने दुकानदारांना धान्य वितरणाचे कमिशन दिलेले नाही. जिल्ह्यात दर महिन्याला साडेबारा हजार टन धान्य वाटपाचे कमिशन १ कोटी ८७ लाख रुपये होते. त्याप्रमाणे चार महिन्यांची सात कोटींपेक्षा अधिक रक्कम अजून दुकानदारांना मिळालेली नाही.
जिल्ह्यातील प्राधान्य व अंत्योदय शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना दर महिन्याला गहू व तांदूळ दिले जाते. जिल्ह्यात १ हजार ६३७ रेशन दुकानदार आहेत. त्यांच्यामार्फत सर्व लाभार्थ्यांना साडेबारा हजार टन धान्याचे वाटप केले जाते. त्यासाठी प्रति क्विंटलमागे दुकानदाराला १५० रुपये दिले जातात. मात्र, नोव्हेंबर महिन्यापासून दुकानदारांना कमिशनच दिले गेलेले नाही.
१० दिवसांचा दिला वेळ, अन्यथा..
कोल्हापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार महासंघाच्या माध्यमातून रेशन दुकानदारांनी बुधवारी कमिशनबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांना भेटून निवेदन दिले. कमिशन न मिळाल्याने रेशन दुकानदार व सेल्समन अडचणीत सापडले आहेत. दुकानाचे मासिक भाडे, लाईट बिल भागवणे अवघड झाले आहे. मार्च एंडिंगमुळे सर्व विभागातील बिल भागवण्यासाठी तगादा आहे. त्यामुळे दुकानदारांचे कमिशन लवकर जमा करा, अशी मागणी जिल्हाध्यक्ष डॉ. रविंद्र मोरे यांनी केली. पुढील दहा दिवसांत कमिशन न मिळाल्यास नाईलाजाने आंदोलन करावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी चव्हाण यांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असून, कमिशन लवकर देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. यावेळी अन्नधान्य वितरण अधिकारी लक्ष्मण माने, लेखा अधिकारी दिलीप कलकुटकी, अव्वल कारकून अक्षय ठोंबरे, आनंदा लादे, दीपक शिराळे, अरुण शिंदे, प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.