जिल्हा बॅंकेसाठी ७ हजार ६४७ संस्था प्रारुप यादीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:24 AM2021-09-03T04:24:09+5:302021-09-03T04:24:09+5:30

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक (केडीसीसी) च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ७ हजार ६४७ संस्थांची प्रारुप मतदार यादी आज शुक्रवारी ...

7 thousand 647 institutions in the draft list for District Bank | जिल्हा बॅंकेसाठी ७ हजार ६४७ संस्था प्रारुप यादीत

जिल्हा बॅंकेसाठी ७ हजार ६४७ संस्था प्रारुप यादीत

Next

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक (केडीसीसी) च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ७ हजार ६४७ संस्थांची प्रारुप मतदार यादी आज शुक्रवारी प्रसिद्ध होणार आहे. १३ ला हरकती तर २२ ला यावर सुनावणी होऊन २७ ला अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे.

सहकार जिल्हा उपनिबंधकांनी जिल्हा बॅंक निवडणुकीची प्रक्रिया सुरु केली असू्न सहकार प्राधिकरणाकडे आलेल्या एकूण ८ हजार ५७१ ठराव धारक संस्थांची छाननी होऊन ९२४ संस्थांना गेल्या गुरुवारी मतदानास अपात्र ठरवण्यात आले होते. शिल्लक राहिलेल्या ७ हजार ६४७ संस्थांची यादी तयार करुन ती प्रारुप मतदार यादी म्हणून आज प्रसिद्ध केली जाणार आहे. जिल्हा बॅंकेसाठी ११ हजार ४४८ संस्थांची नोंदणी होती, पण प्रत्यक्षात यादीला ८ हजार ५७१ संंस्थांनी ठराव दाखल केले आहेत. थकबाकी, अवसायनात जाणे अशी कारणे देत ९२४ संस्थांना आधीच जिल्हा उपनिबंधकांनी अपात्र ठरवले आहेत. त्यामुळे आता या संस्था कायमच्या मतदानासाठी अपात्र ठरल्या आहेत.

प्रारुप मतदार यादी तयार करताना चार गटांमध्ये वर्गवारी करण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्या गटात विविध कार्यकारी संस्था, शेती संस्था, धान्य संस्था अशा १८६६ संस्थांचा समावेश आहे. दुसऱ्या गटात कृषी पणन, खरेदी विक्री, पणन संस्था यांच्या ४४९ संस्था आहेत. तिसऱ्या गटात नागरी बॅंका व पतसंस्था अशा १२२१ संस्था आहेत. चौथ्या गटात औद्योगिक, मजूर, दूधसंस्था, गृहनिर्माण, ग्राहक, सर्वसाधारण व व्यक्ती सभासदांचा समावेश आहे.

प्रारुप यादी आज प्रसिद्ध होत असल्याने खऱ्या अर्थाने जिल्हा बॅंक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. मागील आठवड्यात जिल्हा उपनिबंधकांनी ९२४ संस्था मतदानासाठी आधीच अपात्र करुन पहिला झटका दिला असल्याने आता ही प्रारुप मतदार यादी अंतिम होईपर्यंत बऱ्याच शहकाटशह घडण्याची शक्यता असल्याने सत्ताधारी आणि विरोधक अलर्ट मोडवर आले आहेत.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत सध्यातरी सत्ताधारी आघाडीचे पारडे जड असलेतरी आघाड्या कशा होतात, कोणता गट कोणाबरोबर राहतो यावर बरेच अवलंबून असल्यामुळे त्यादृष्टीने आता जोडण्या लावण्यास सुरुवात होणार आहे. बॅंकेची निवडणूक लागू नये, झालीच तर ती बिनविरोध व्हावी यासाठीची मोठी यंत्रणा कामाला लागली आहे. त्यामुळे अंतिम मतदार यादी तयार होईपर्यंत बऱ्याच राजकीय घडामोडी अपेक्षित असल्याने हा महिना जिल्ह्याचे अर्थकारण सांभाळणाऱ्या बॅंकेसाठी आणि पक्ष गटांच्या नेत्यांसाठी कसोटीचा असणार आहे.

Web Title: 7 thousand 647 institutions in the draft list for District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.