महिलांची ७० लाखांची फसवणूक

By Admin | Published: March 25, 2015 12:20 AM2015-03-25T00:20:32+5:302015-03-25T00:40:57+5:30

अंबपच्या महिलेचे पलायन : कर्ज फेडण्यासह १० टक्के रकमेचे ३०० जणींना आमिष

70 lakh women fraud | महिलांची ७० लाखांची फसवणूक

महिलांची ७० लाखांची फसवणूक

googlenewsNext

सुहास जाधव -पेठवडगाव ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए’ या म्हणीचा प्रत्यय अंबप (ता. हातकणंगले) येथील महिलांना आला आहे. येथील काही महिलांच्या नावावर कर्ज काढून त्यातील ९० टक्के रकमेसह तथाकथित पुढारी महिलेने पलायन केले आहे. सुजाता रघुनाथ कांबळे असे या महिलेचे नाव आहे. तिने सुमारे ३०० महिलांची अंदाजे ७० लाखांची फसवणूक केली आहे. वित्तीय संस्थांच्या वसुलीच्या जगाद्याने हैराण झालेल्या महिलांनी मदतीसाठी पोलिसांना साकडे घातले आहे.
सुजाता कांबळे हिने अंबप येथील बौद्ध, मातंग, चर्मकार समाजातील महिलांना विविध संस्थांत व्यक्तिगत कर्ज काढण्यास सांगितले. या कर्जातील ९० टक्के रक्कम आणि एकूण कर्जावरील व्याज आपण फेडणार असून, त्यासाठी कर्जदार महिलांना १० टक्के रक्कम दिली, तर आपण ९० टक्के रक्कम घेतली. तिच्या या योजनेला सुमारे ३०० महिला बळी पडल्या असून, त्यांनी अंदाजे ७० लाखांपर्यंत विविध संस्थांचे कर्ज घेतले आहे.
कर्ज मिळाल्यावर प्रारंभीच्या काही रकमा कांबळे हिने महिलांचा विश्वास संपादन करण्यासाठी भरलेल्या होत्या. दरम्यान, सुजाता कांबळे ही १४ मार्च २०१५ पासून बेपत्ता झाली आहे. याबाबत वडगाव पोलिसांत तिच्या मुलाने फिर्याद दिलेली आहे.
मार्च महिना आर्थिक वसुलीचा आहे. त्यामुळे रत्नाकर बँक, वडगाव, ग्रामशक्ती फायनान्स, बी. एस. एस. फायनान्स पेठवडगाव, सूर्योदय फायनान्स, कोल्हापूर, फिनोमायक्रो फायनान्स कदमवाडी-कोल्हापूर, शिवम सहकारी बँक, श्रमशक्ती पतसंस्था इचलकरंजी, आदींनी रक्कम भरण्यास थेट कर्जदारांमागे तगादा लावला. त्यामुळे अपहार झाल्याचा महिलांचा संशय बळावला. त्यांनी संबंधित महिलेचा शोध घेतला असता ती बेपत्ता असल्याचे आढळले. संतप्त पीडित महिलांनी तिच्या मुलास जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने आमचा काही संबंध नसल्याची भूमिका घेतली आहे.
सुमारे ७० महिलांची १७ मार्चला बैठक झाली. त्यामध्ये न्याय मागण्यासाठी वडगाव पोलिसांत धाव घेतली. त्या सर्वांनी पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले. तपासासाठी पोलिसांनी मदत करावी, यासाठी महिला प्रयत्न करीत आहेत. मात्र संबंधित महिलांनी सह्या केलेल्या आहेत. त्यामुळे काय कारवाई करायची, हा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

महिलांनी स्वत:च्या नावावर कर्ज काढून दिले
कर्जातील ९० टक्के रक्कम आणि एकूण कर्जावरील व्याज स्वत: फेडण्याचे आश्वासन
प्रारंभी काही हप्ते भरले, मात्र त्यानंतर कर्ज थकल्यामुळे वित्तीय संस्थांचा वसुलीसाठी तगादा
ठकसेन महिलेच्या कुटुंबीयांकडून हात वर

Web Title: 70 lakh women fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.