पर्यायी रस्त्यांसाठी हवेत ७० लाख
By admin | Published: June 20, 2014 01:03 AM2014-06-20T01:03:36+5:302014-06-20T01:08:45+5:30
महापौरांनी केली पाहणी : प्रशासनाला आराखडा सादर करण्याचे आदेश
कोल्हापूर : टोलवसुलीतून शहरवासीयांना दिलासा देण्यासाठी नाके वगळून जाता येणाऱ्या सर्व नऊ नाक्यांवरील पर्यायी रस्त्यांची आज, गुरुवारी महापौर सुनीता राऊत यांनी पाहणी केली. पर्यायी रस्त्यांच्या दुरस्तीसाठी ६० ते ७० लाख रुपयांची गरज असून तत्काळ आराखडा तयार करा निधी उपलब्ध करू, असे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले.
टोल पंचगंगेत बुडविण्याची घोषणा करून टोलचे भूत दोन्ही मंत्र्यांनी स्वत:च्या मानगुटीवर घेतले आहे. आयआरबीला टोलवसुलीसाठी थांबण्यासाठी सूचना करूनही टोलवसुलीची कुरघोडी केली आहे. टोलवसुली सुरू करून प्रकल्पाचे पैसे देण्यासाठी शासनासह दोन्ही मंत्र्यांवर आयआरबीने दबावतंत्राचा वापर केला आहे. आयआरबीच्या कुरघोड्यांना उत्तर देण्यासाठी टोलनाक्यांना सहज चुकविता येणारे रस्ते उपलब्ध करून देण्याची योजना महापालिकेने आखली आहे. याअनुषंगाने आज महापौरांनी शिरोली व शाहू नाक्यावरील पर्यायी रस्त्यांची पाहणी केली.
नऊ नाक्यांसाठी उपलब्ध असलेल्या रस्त्यांची पाहणी करून ते वाहतुकीसाठी सक्षम करण्यासाठी खर्चाचा आराखडा तयार करा. यासाठी लागणारा खर्चाचे पैसे तत्काळ उपलब्ध करून देवू, असे महापौरांनी प्रशासनास सांगितले. यावेळी उपमहापौर मोहन गोंजारे, नगरसेवक राजू लाटकर,चंद्रकांत घाटगे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त संजय हेरवाडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत आदींसह बांधकाम विभागातील अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)