Kolhapur- पंचगंगा प्रदूषण: इचलकरंजीचे ७० टक्के दूषित पाणी थेट पंचगंगेत 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 05:24 PM2024-06-21T17:24:07+5:302024-06-21T17:26:19+5:30

दोन प्रकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेत

70 percent of Ichalkaranji polluted water directly into Panchganga river in kolhapur | Kolhapur- पंचगंगा प्रदूषण: इचलकरंजीचे ७० टक्के दूषित पाणी थेट पंचगंगेत 

छाया-उत्तम पाटील

अतुल आंबी

इचलकरंजी : शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा आजतागायत पूर्ण क्षमतेने कार्यरत नसल्याने सुमारे ७० टक्के मैलामिश्रित सांडपाणी काळ्या ओढ्यातून थेट पंचगंगा नदीत मिसळणे सुरूच आहे. त्यामुळे कोल्हापूरनंतर इचलकरंजीच प्रदूषणाला जबाबदार मुख्य घटक ठरत आहे. उन्हाळ्यात जाणवणारी प्रदूषणाची तीव्रता आता पावसाळा सुरू झाल्यानंतर दुर्लक्षित होते. परिणामी, किमान डिसेंबरपर्यंत नदी प्रदूषणाचा विषय दुर्लक्षित राहतो. याकडे कोणी गांभीर्याने पाहणार आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला असून, त्यावर ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. इचलकरंजी शहरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर पूर्ण क्षमतेने प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेकडे यंत्रणा नाही. नव्याने निर्माण होणाऱ्या २० दशलक्ष लिटर क्षमतेच्या एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) चे काम संथगतीने सुरू आहे, तर जुनी २० दशलक्ष लिटर क्षमतेची यंत्रणा कालबाह्य असून, वारंवार बंद पडत असते. परिणामी, दररोज निर्माण होणाऱ्या ४० दशलक्ष लिटर सांडपाण्यातील सुमारे ७० टक्के सांडपाणी विनाप्रक्रिया नदीत मिसळते. दिखाव्यापुरती तोकडी यंत्रणा सध्या कार्यान्वित असून, अनेकवेळा त्याच त्या पाण्यावर प्रक्रिया होते, तर संपवेल बंद पडला की पाणी थेट नदीत मिसळते.

शहरातील औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी नऊ दशलक्ष लिटर क्षमतेचा सीईटीपी (रासायनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) कार्यान्वित आहे. परंतु, नवीन नियमानुसार त्यांना झेडएलडी (झिरो लिक्विड डिस्चार्ज) प्रकल्प राबविण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार मैलखड्डा परिसरात जागा घेऊन १५ दशलक्ष लिटर क्षमतेचा झेडएलडीचा प्रकल्प मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळाली असून, पुढील प्रक्रिया पार पडल्यानंतर त्याचे काम सुरू होणार आहे.

एकूणच सध्या इचलकरंजी शहरातून प्रदूषित पाणी पंचगंगा नदीत मिसळत असल्याचे चित्र आहे. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी तक्रारी केल्या. तक्रार प्राप्त झाल्यानंतरच या विभागाकडून पाहणी आणि नमुने घेतले जातात. या नमुन्याचे पुढे काय होते, याचा कधीच शोध लागत नाही. त्याचबरोबर पुढील सोपस्कर पूर्ण करण्यासाठी म्हणून मंडळाकडून महापालिकेला नोटीस दिली जाते. १५ वर्षात अशा कित्येक नोटीस पालिकेला मिळाल्या असतील. परंतु, वीस दशलक्ष लिटरच्या नवीन एसटीपी प्रकल्पाच्या मंजुरीव्यतिरिक्त काहीच महत्त्वपूर्ण सुधारणा अथवा उपाययोजना दिसत नाही.

कलानगर ओढ्यावर प्रक्रिया नाहीच

सध्या शहरातील काळा ओढा, कलानगर चंदूर ओढा यातून शहरातील सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळते. त्याचबरोबर काही रंगण्यांचे (साध्या कापडाला रंगीत करणारे छोटे कारखाने) पाणी ओढ्यातून नदीत मिसळते.

दोन प्रकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेत

महापालिकेने कलानगर ओढ्यातून पंचगंगा नदीत मिसळणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी तेरा दशलक्ष लिटरचा आणि टाकवडे वेस येथील जागेत आणखीन १९ दशलक्ष लिटरचा असे दोन एसटीपी शासनाकडे मागितले आहेत. ते दोन्ही प्रकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.

दृष्टिक्षेपात

  • इचलकरंजी शहर लोकसंख्या - सुमारे चार लाख
  • नळजोडणी - ४३ हजार
  • औद्योगिक नळजोडणी - तीन हजार
  • कूपनलिका - ७२०, २१० हातपंप
  • खासगी कूपनलिका - २५००
  • निर्माण होणारे सांडपाणी - ४० (दशलक्ष लिटर)
  • सध्याचा एसटीपी - २० (दशलक्ष लिटर)
  • नवीन मंजूर एसटीपी - २० (दशलक्ष लिटर)
  • मंजूर - प्रक्रियेत १३ व १९ (दशलक्ष लिटर)
  • सध्याचा सीईटीपी - ९ (दशलक्ष लिटर)
  • मंजूर प्रक्रियेतील झेडएलडी - १५ (दशलक्ष लिटर)
     

Web Title: 70 percent of Ichalkaranji polluted water directly into Panchganga river in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.