कोल्हापुरात ७०.३५, हातकणंगलेत ६८.०७ टक्के मतदान, उत्सुकता निकालाची

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 12:26 PM2024-05-08T12:26:32+5:302024-05-08T12:27:01+5:30

अंतिम टक्केवारी आज, बुधवारी सायंकाळी चार वाजता जाहीर करण्यात येणार

70 percent polling in Kolhapur and 68 percent in Hatkanangle for the Lok Sabha elections | कोल्हापुरात ७०.३५, हातकणंगलेत ६८.०७ टक्के मतदान, उत्सुकता निकालाची

कोल्हापुरात ७०.३५, हातकणंगलेत ६८.०७ टक्के मतदान, उत्सुकता निकालाची

कोल्हापूर : संपूर्ण राज्याला मतदानाची टक्केवारी वाढविण्याची चिंता लागून राहिली असताना उन्हाचा पारा ४० अंशांवर गेल्यावरही कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांत अनुक्रमे ७०.३५ आणि ६८.०७ टक्के मतदान झाले. वेळ संपली तरी सायंकाळनंतर अनेक केंद्रांवर मतदारांच्या रांगा होत्या.

काल, मंगळवारी रात्री उशिरा जिल्हा प्रशासनाने मतदानाची ही टक्केवारी जाहीर केली. मात्र, अंतिम टक्केवारी आज, बुधवारी सायंकाळी चार वाजता जाहीर करण्यात येणार असून, या दोन्ही मतदारसंघांमध्ये एक ते दीड टक्क्याने मतदान वाढणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

किरकोळ तांत्रिक अडचणी आणि शाब्दिक वाद वगळता मतदान शांततेत झाले. लोकसभेलाही ग्रामपंचायतीप्रमाणे रांगा लावून मतदान करून कोल्हापूरने मतदानाच्या टक्केवारीत आपण राज्यात भारी असल्याचे कृतीतून दाखवून दिले. गेल्या निवडणुकीत कोल्हापूरला ७०.७७ आणि हातकणंगले येथे ७० टक्के मतदान झाले होते.

कोल्हापूरला एकूण २३ उमेदवार रिंगणात होते; परंतु मुख्य लढत महाविकास आघाडीचे शाहू छत्रपती आणि महायुतीचे खासदार संजय मंडलिक यांच्यात झाली. हातकणंगलेत २७ उमेदवार रिंगणात असले, तरी मुख्य लढत महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील, महायुतीचे खासदार धैर्यशील माने आणि स्वाभिमानी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्यातच झाली. 

दोन्ही मतदारसंघांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली. गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तर पाचवेळा कोल्हापूरला आले व आठ दिवस त्यांचा मुक्काम होता. ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते रमेश चेन्निथला यांच्या दौऱ्यामुळे दोन्ही लढती अत्यंत चुरशीच्या झाल्या. कोल्हापूरचे शाहू छत्रपती रिंगणात असल्याने देशाचे लक्ष या लढतीकडे लागून राहिले. शेट्टी यांच्या राजकीय भवितव्याचा फैसला होणार असल्याने त्याकडेही राज्याचे लक्ष राहिले.

दिवसभर ऊन असणार म्हणून मतदारांनी सकाळी सात वाजल्यापासूनच केंद्रावर रांगा लावल्या. त्यामुळे सकाळी ११ वाजेपर्यंतच सरासरी ३० टक्के मतदान झाले होते. एका मतदारास मतदान करण्यास किमान दीड मिनिट लागत होता. मतदारांत कमालीचा उत्साह जाणवत होता. प्रचारातील ईर्षा मतदान करून घेण्यातही दिसल्याने चांगले मतदान झाले. जिल्हा प्रशासनानेही त्यासाठी गेले महिनाभर चांगले प्रयत्न केले होते.

कोल्हापूरकरांचे कौतुक..

दोन्ही मतदारसंघांत चांगल्या टक्केवारीने मतदान झाल्याबद्दल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कोल्हापूरकरांचे कौतुक केले. प्रशासनाच्या आवाहनास उत्तम प्रतिसाद दिल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील टक्केवारी राज्यात सर्वांत जास्त असल्याचा दावा त्यांनी केला.

मतमोजणी ४ जूनला

मतमोजणी ४ जूनला होणार असल्याने ६ जूनपर्यंत आचारसंहिता सुरूच राहणार आहे. कोल्हापूरची मतमोजणी रमणमळ्यात, तर हातकणंगलेची मतमोजणी राजाराम तलाव परिसरात पाटबंधारे विभागाच्या गोदामात होईल. या दोन्ही ठिकाणी मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत सर्व केंद्रांवरील एव्हीएम मशिन्स आणली जातील. तिथेच त्रिस्तरीय पोलिस बंदोबस्तात ती ठेवण्यात येतील असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

यंत्रांतील बिघाड..

कोल्हापूर मतदारसंघात १० बॅलेट युनिट, ५ कंट्रोल युनिट व १६ व्हीव्हीपॅटमध्ये, तर हातकणंगलेत ४ बॅलेट युनिट, २ कंट्रोल युनिट आणि ६ व्हीव्हीपॅटमध्ये तांत्रिक बिघाड झाला. ही यंत्रे नादुरुस्त होईपर्यंतच्या मतदानाची मोजणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

कोल्हापूरकरांचा कोणत्याही मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद असतो. तसाच तो मतदानातही पाहायला मिळाला. त्यामुळेच चांगल्या टक्केवारीने मतदान झाले. कुठेही बोगस मतदानाची तक्रार नाही. - अमोल येडगे जिल्हाधिकारी कोल्हापूर.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघनिहाय आकडेवारी

मतदारसंघाचे नाव  - २०२४ - २०१९

  • चंदगड -  ६८.१८ -  ६५.८६
  • कागल -  ७३.८० - ७५.७९
  • करवीर -  ७८.८९ - ७५.४२
  • कोल्हापूर उत्तर -  ६४.५४ - ६६.०७
  • कोल्हापूर दक्षिण -  ६९.८० -  ७०.५७
  • राधानगरी -  ६६.६८  - ७०.७७


हातकणंगले लोकसभा मतदारसंघ

विधानसभा मतदारसंघाचे नाव  - २०२४ - २०१९

  • हातकणंगले -  ७०.०० - ७५.९४
  • इचलकरंजी  - ६६.०५  - ६८.१६            
  • इस्लामपूर  -  ६७.२० - ६९.५३                        
  • शाहूवाडी - ७०.९६  - ६६.७३            
  • शिराळा -  ६५.९६ - ६७.५३            
  • शिरोळ -  ६८.००  - ७३.११

Web Title: 70 percent polling in Kolhapur and 68 percent in Hatkanangle for the Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.