Kolhapur Crime: पाच मिनिटांत दुचाकीच्या डिकीतील ७० हजार लंपास
By उद्धव गोडसे | Published: March 28, 2023 03:05 PM2023-03-28T15:05:25+5:302023-03-28T15:05:57+5:30
बँकेत धनादेश भरण्यासाठी गेला, तोपर्यंत चोरट्यांनी रक्कम लंपास केली
कोल्हापूर : शाहूपुरीतील पाच बंगला परिसरात एका बँकेसमोर पार्क केलेल्या दुचाकीच्या डिकीतील ७० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. सोमवारी (दि. २७) दुपारी अडीचच्या सुमारास अवघ्या पाच मिनिटांत हा प्रकार घडला. याबाबत संदीप शंकर नलवडे (वय २७, रा. धोंडेवाडी बीड, ता. करवीर) याने शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शाहूपुरीत एका ट्रेडिंग कंपनीत काम करणारा कर्मचारी संदीप नलवडे हा सोमवारी दुपारी मार्केट यार्ड परिसरातील एका बँकेत पैसे काढण्यासाठी गेला होता. बँकेतून काढलेली ७० हजार रुपयांची रक्कम त्याने दुचाकीच्या डिकीत ठेवली. त्यानंतर पाच बंगला परिसरातील एका बँकेत धनादेश भरण्यासाठी तो गेला. बँकेच्या बाहेर दुचाकी पार्क करून तो सात मिनिटांत बँकेतून बाहेर आला. त्यावेळी त्याला दुचाकीच्या डिकीचे झाकण उघडे दिसले. डिकीतील रकमेची चोरी झाल्याचे लक्षात येताच त्याने शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.
दोघांचे कृत्य
पोलिसांनी बँकेच्या बाहेरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, दोन चोरट्यांनी अवघ्या पाच मिनिटांत दुचाकीच्या डिकीचे लॉक तोडून रक्कम घेऊन पलायन केल्याचे दिसले. सीसीटीव्ही फुटेज धूसर असल्यामुळे चोरट्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नाहीत. मार्केट यार्डपासून पाठलाग करून चोरट्यांनी पैसे लांबवले असावेत, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.