७० टक्के लस दुसऱ्या डोसच्या नागरिकांसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:41 AM2021-05-05T04:41:51+5:302021-05-05T04:41:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर उपलब्ध होणाऱ्या डोसपैकी ७० टक्के डोस दुसऱ्या डोस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर उपलब्ध होणाऱ्या डोसपैकी ७० टक्के डोस दुसऱ्या डोस घेणाऱ्या नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ‘लोकमत’ने दुसऱ्या डोस घेऊ इच्छिणाऱ्यांची झालेली कोंडी मंगळवारच्या अंकात मांडली होती. बुधवारी ३४ हजार ४०० डोस उपलब्ध होणार असून गेले चार दिवस थांबलेले लसीकरण पुन्हा सुरू होणार आहे. दरम्यान, मंगळवारी २७ केंद्रांवर १३६६ नागरिकांना डोस देण्यात आले आहेत.
चार दिवसांच्या अंतरानंतर ३४ हजार ४०० डोस घेऊन गाडी पुण्याहून निघाली असून बुधवारी सकाळी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात या लसीचे वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे दिवसभरात बहुतांशी केंद्रांवर लस उपलब्ध होणार आहे. ज्यांनी पहिला डोस घेतला आहे अशांना दुसरा डोस घेताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने मंगळवारी प्रसिद्ध केले होते. लस संपणे, मोठी गर्दी यासारख्या अनेक कारणांमुळे दुसरा डोस घेणाऱ्यांची मुदत संपत असल्याचा मुद्दा यातून मांडण्यात आला होता. तसेच यासाठी वेगळे नियोजन करण्याची गरजही व्यक्त केली होती.
याची दखल घेत बुधवारी उपलब्ध होणाऱ्या लसीमधील ७० टक्के लस ही दुसऱ्या डोस साठीच्या नागरिकांसाठी वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांना सर्वच लसीकरण केंद्रांवर प्राधान्य देण्यात येणार आहे.
कोट
दुसरा डोस घेताना नागरिकांना अनेक अडचणी येत आहेत. याचा विचार करून उपलब्ध होणाऱ्या लसीमधील ७० टक्के डोस दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांना प्राधान्याने द्यावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
डॉ. फारुक देसाई
जिल्हा समन्वयक, लसीकरण मोहीम