मिरजेतील डॉक्टरची ७० लाखांची फसवणूक; दोघांना अटक
By Admin | Published: June 26, 2015 11:35 PM2015-06-26T23:35:46+5:302015-06-27T00:16:35+5:30
कोल्हापुरात घर देण्याचे आमिष : चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
मिरज : मिरजेतील डॉक्टरला कोल्हापुरात घर व जागा देण्याचे आमिष दाखवून त्यांची ७० लाखांची फसवणूक केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. डॉ. अजित चौधरी असे फसवणूक झालेल्या डॉक्टरचे नाव असून, बबन मारुती कांबळे (वय ५०), दीपक वासू शेट्टी (४५, रा. सुभाषनगर, मिरज), शिवराज सावंत, अमर सूर्यवंशी (रा. कोल्हापूर) यांच्याविरुद्ध गांधी चौक पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील बबन कांबळे व दीपक शेट्टी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.मिरजेतील डॉ. अजित चौधरी यांना कोल्हापुरातील शिवराज सावंत याची राधानगरी रस्त्यावर असलेली १२ एकर जमीन व घर विकत देण्याचे आमिष दाखवून ७० लाख रुपये उकळले. जमीन व घर वडिलांचे असताना, त्यांच्या संमतीशिवाय शिवराज सावंत याच्यासह चौघांनी मालमत्ता विक्रीसाठी बोगस वटमुखत्यारपत्र करून फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. चौधरी यांनी पोलिसांत धाव घेतली. शिवराज सावंत व मध्यस्थ बबन कांबळे यांनी डॉ. चौधरी यांना रक्कम परतीसाठी धनादेश दिले. मात्र, धनादेश वठले नाहीत. रक्कम परतीची विचारणा केल्यानंतर त्यांनी डॉ. चौधरी यांना रक्कम परत मिळणार नसल्याचे सांगून धमकी दिली. याप्रकरणी बबन कांबळे, दीपक शेट्टी, शिवराज सावंत, अमर सूर्यवंशी या चौघांविरुद्ध गांधी चौक पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. जमीन विक्रीच्या व्यवहारात मध्यस्थी करणाऱ्या बबन कांबळे व दीपक शेट्टी या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, सावंत व सूर्यवंशी फरारी आहेत. कांबळे व शेट्टी यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)