सत्तरीच्या तरूणाची पाण्यातील योगासने लयभारी, मोहन नातू यांचे कोल्हापूरात प्रात्यक्षिके
By सचिन भोसले | Published: January 7, 2024 02:41 PM2024-01-07T14:41:31+5:302024-01-07T14:42:01+5:30
यावेळी जलतरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोल्हापूर : मुळचे अहमदनगरचे व्यावसायिक असलेले सत्तर वर्षीय मोहन नातू यांना योगासनाची आवड आहे. तेही पाण्यातील याेगासनात ते पारंगत आहेत. त्याचाच प्रचार आणि प्रसारासाठी नातू यांनी रविवारी सकाळी गोखले काॅलेजसमोरील सर पिराजीराव घाटगे ट्रस्टच्या भवानी जलतरण तलावात पाण्यातील योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी जलतरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोहणे हा सर्वांगसुंदर व्यायाम आहे. आपणही जीवनात पोहण्याच्या उत्तम व्यायामाला सुरुवात करून निरोगी राहा आणि आयुष्यभर सर्व आनंदाचा उपभोग घ्या. असे संदेश देत नातू यांनी यापुर्वी अहमदनगर, नाशिक आणि आता कोल्हापूरात पाण्यातील योगासनांची प्रात्याक्षिके सादर केली. सकाळी ९ ते १० या दरम्यान नातू यांनी ही प्रात्यक्षिके सादर केली. यात शरीराला ताण व त्या अवस्थेत शिथील सर्व स्नायू,ना ताण देत रक्ताभिसरण उत्तम करणारे ताडासन करून दाखविले.
त्यानंतर शवासन करून दाखविले. त्यापाठोपाठ वक्षविस्तारासन, वक्षविस्तारअर्धपद्मासन (दक्षणपद उजवा पाय), वक्षविस्तारअर्धपद्मासन(वामपद, डावापाय), शयनस्थितीत धनुरासन, जानूसंचालन दक्षिणपद, जानूसंचालन वामपद, वज्रासनात ज्ञानमुद्रा, सूक्ष वज्रासन, पूर्ण वज्रासन, पद्मासन, ताडासन, पद्मासन मानेखाली हात, मत्स्यान, भद्रासन, मत्सयान आदी आसने सादर केली. यावेळी सागर पाटील जलतरण तलावाचे ज्येष्ठ जलतरणपटू अरूण मराठे, राष्ट्रीय प्रशिक्षक पृथ्वीराज सरनाईक, उद्योजक विद्यानंद देवधर, सीए. महेश दामले, सीए गीता नातू-दामले उद्योजक सचिन कुमठेकर, भवानी जलतरण तलावाचे मुख्याधिकारी बी.ए.पाटील ,व्यवस्थापक अनिल देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वच आरोग्यांच्या समस्येपासून दुर राहण्यासाठी मी वयाच्या साठीत पोहणे आणि त्यातील आसने शिकलो. त्यामुळे माझे आरोग्य ठणठणीत आहे. त्याचप्रमाणे तुम्हीही पोहण्यासारखा सर्वांगसुंदर व्यायाम करा आणि ठणठणीत राहा.
मोहन नातू, योग अभ्यासक, अहमदनगर