विदेशीपेक्षा देशी जोरात; वर्षभरात ७०० कोटींची दारू कोल्हापूरकरांच्या पोटात
By उद्धव गोडसे | Updated: December 27, 2024 16:57 IST2024-12-27T16:55:45+5:302024-12-27T16:57:07+5:30
बेकायदेशीर विक्रीही जोरदार, ख्रिसमस ते ३१ डिसेंबरदरम्यान विक्रीच्या वेळेत वाढ

विदेशीपेक्षा देशी जोरात; वर्षभरात ७०० कोटींची दारू कोल्हापूरकरांच्या पोटात
उद्धव गोडसे
कोल्हापूर : मद्यप्राशन हा आपल्या जीवनशैलीचा भाग नसला तरीही, अलीकडे अनेकांचे रोजचे जगणे याने व्यापले आहे. पिणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे दारूच्या विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या वर्षभरात कोल्हापूरकरांनी तब्बल ७०० कोटी रुपयांची पावणेदोन कोटी लिटर दारू रिचवली. रोज सरासरी ४८ हजार लिटर दारूची विक्री होत आहे. विशेष म्हणजे मद्यपी अजूनही विदेशीपेक्षा देशीलाच पसंती देत असल्याचे दारूच्या विक्रीतून स्पष्ट होत आहे.
काही वर्षांपूर्वी दारू पिणे निषिद्ध मानले जात होते. पिणाऱ्यांना सामाजिक प्रतिष्ठा नव्हती. दारूच्या व्यसनात अनेकांनी आपल्या संसाराची राखरांगोळी केल्याचीही उदाहरणे आपल्याला आसपास दिसतात; पण अलीकडे बदलत्या जीवनशैलीत मर्यादित दारू पिणे फारसे गैर मानले जात नाही. चंगळवादी संस्कृतीचे अनुकरण, वीक एंड पार्टीचे वाढते फॅड, पिणाऱ्यांमध्ये तरुणांची वाढती संख्या यामुळे दारूच्या विक्रीत सातत्याने वाढ होत आहे.
गेल्या वर्षभरात कोल्हापूरकरांनी तब्बल १ कोटी ८० लाख लिटर दारू रिचवली. याची किंमत अंदाजे ७०० कोटी रुपयांवर आहे. येणाऱ्या काही वर्षांत दारू विक्री आणखी वाढण्याचा अंदाज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.
बेकायदेशीर विक्रीही जोरदार
गोवा आणि कर्नाटकातून छुप्या मार्गाने कोल्हापुरात येणाऱ्या दारूचे प्रमाण मोठे आहे. गेल्या वर्षभरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने साडेचार लाख लिटर बेकायदेशीर दारू पकडून सुमारे दोन हजार संशयितांवर कारवाई केली.
देशीलाच पसंती
विदेशी दारूचा बोलबाला असला तरीही मद्यपींकडून देशी दारूलाच पसंती मिळत आहे. विदेशी दारूची वाढलेली किंमत परवडत नसल्याने अनेकांचा देशी घेण्याकडे कल वाढला आहे. पिणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळेच देशीच्या मागणीत वाढ असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शासनाला ३७८ कोटींचा महसूल
जिल्ह्यातील दारूची निर्मिती, विक्री आणि विविध परवान्यांमधून एप्रिल ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत ३७८ कोटी रुपयांचा महसूल शासनाला मिळाला. दारू विक्रीची दुकाने वाढविण्याचा प्रस्ताव या विभागाने अर्थ खात्याला दिला आहे. त्यावर निर्णय झाल्यास भविष्यात विक्रीत आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे.
विक्रीच्या वेळेत वाढ
ख्रिसमस ते ३१ डिसेंबरदरम्यान पर्यटन आणि पार्ट्यांचा हंगाम असतो. या काळात दारू विक्रीची दुकाने मध्यरात्री एकपर्यंत सुरू ठेवण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने सर्व विक्रेत्यांना सूचना दिल्या आहेत. अवैध विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी ९ भरारी पथके कार्यरत आहेत. विनापरवाना पार्टीचे आयोजन केल्यास कारवाई करण्याचा इशारा अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी दिला आहे.
अशी झाली विक्री
देशी दारू - ६८ लाख ४ हजार २३२ लिटर
विदेशी दारू - ६६ लाख ३० हजार २६६ लिटर
बिअर - ४६ लाख ३३ हजार ५८४