कोल्हापूर जिल्ह्याने केला मतदानाचा विक्रम; अंतिम आकडेवारी जाहीर..जाणून घ्या सविस्तर
By इंदुमती सूर्यवंशी | Published: May 8, 2024 07:25 PM2024-05-08T19:25:49+5:302024-05-08T19:32:55+5:30
२०१९ च्या तुलनेत १.१० टक्क्यांनी वाढ : करवीर सर्वात पुढे
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत अन्य जिल्ह्यांमध्ये कमी झालेले मतदान ही चिंतेची बाब असताना कोल्हापूर जिल्ह्याने आजवर झालेल्या लोकसभा निवडणुकीत यंदा सर्वाधीक मतदानाचा विक्रम केला आहे. लोकसभेसाठी कोल्हापुरातून ७१.५९ टक्के तर हातकणंगलेमधून ७१.११ टक्के इतके मतदान झाले. २०१९ च्या तुलनेत यंदा दोन्ही मतदारसंघात १.१० टक्क्यांनी मतदान वाढले आहे. करवीरमध्ये सर्वाधीक ७९.६१ टक्के मतदान झाले आहे. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांनी बुधवारी सायंकाळी मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर केली.
पुरोगामी विचारांचा वारसा आणि सजग नागरिकांमुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून जिल्हा परिषद, महापालिका, विधानसभा ते लोकसभा अशा सर्वच निवडणुकांमध्ये कायमच जिल्ह्यात सर्वाधीक मतदान होते. मतदानाची हीच परंपरा कायम राखत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मागील निवडणुकांमधील सर्वाधीक मतदानाची आकडेवारी मागे टाकत मंगळवारी कोल्हापूरकरांनी उच्चांकी मतदान केले.
मंगळवारी उन्हाचा तडाखा असतानाही लोकशाहीचे कर्तव्य पार पडण्यासाठी जिल्ह्यातील लाखो मतदार घराबाहेर पडले. दुपार वगळता सकाळी व सायंकाळी ५ नंतर मोठ्या प्रमाणात मतदान झाले. अनेक केंद्रांवर रात्री ८ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. जिल्हा निवडणूक विभागाने गेले सहा महिने मतदार याद्या अपडेट करून त्यातून मयत, दुबार, स्थलांतरीत मतदारांची नावे कमी केली आहेत. तसेच मतदान जागृती मोठ्या प्रमाणात करण्यात आली. नवमतदारांमध्ये वाढ झाली. त्याचाही परिणाम मतदानाच्या टक्केवारीत दिसून आला.
कोल्हापुरात करवीर पुढे
कोल्हापूरसाठी झालेल्या मतदानात करवीर पुढे असून येथे ७९.६१ टक्के मतदान झाले आहे. तर सर्वात कमी मतदान कोल्हापूर उत्तरमध्ये झाले असून येथे ६५.३१ टक्के मतदान झाले आहे.
हातकणंगलेच पुढे
हातकणंगले मतदारसंघात हातकणंगलेमध्येच सर्वाधीक ७५.३२ टक्के मतदान झाले आहे. या लोकसभा मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील शिराळा व इस्लामपूर हे दाेन तालुके येतात. येथील शिराळा मतदारसंघात ६७.३९ टक्के मतदान झाले आहे.