विषाच्या तस्करीसाठी पाळले ७१ साप
By admin | Published: December 28, 2016 12:29 AM2016-12-28T00:29:56+5:302016-12-28T00:29:56+5:30
दोघांना अटक : राहत्या फ्लॅटमधून ३१ कोब्रा, ४० घोणस व विषाच्या तीन बाटल्या जप्त
हनुमंत देवकर --चाकण (पुणे) --सर्पविषाच्या तस्करीसाठी तब्बल ३१ कोब्रा, ४० घोणस राहत्या फ्लॅटमध्ये ठेवल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी पुण्याजवळ उघडकीस आला. खराबवाडी येथील सारा सिटीतील एका फ्लॅटवर मंगळवारी छापा मारून प्लास्टिक बॅरल व लाकडी पेटीतून हे सर्व अतिजहाल विषारी साप आणि विषाच्या तीन बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या. त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत ३० लाख आहे. याप्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ कलम ९ व ११
अन्वये गुन्हा दाखल करुन रणजित पंढरीनाथ खारगे (वय ३७, रा. सारा सिटी, मूळगाव कुंडल, ता. पलूस, जि. सांगली) व धनाजी अभिमान बेळकुटे (मूळगाव वरकुटे मुर्टी, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांना पोलिसांनी अटक केली आहे. खारगे याच्यावर २००५ मध्ये कल्याण व सांगली जिल्ह्यातील मिरज पोलीस ठाण्यात अशा प्रकारचा गुन्हा दाखल असून त्याला सांगली जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून तो या फ्लॅटमध्ये राहत होता.
सर्पमित्र व होमगार्ड अक्षय खोपडे यांना याबाबत माहिती मिळाली होती. त्यांनी फ्रेंड्स आॅफ नेचर असोसिएशनचे अध्यक्ष बापूसाहेब सोनवणे व पोलिसांना कळविले. उपविभागीय अधिकारी मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. घरातून एक २०० लिटरचा बॅरल, कोब्रा ठेवलेली लाकडी पेटी, विषाच्या बाटल्या, साप पकडण्याच्या स्टिक, साप ठेवण्याच्या बरण्या, विष काढण्याच्या काचेच्या नळ्या, भांडीही जप्त केली.
भाडेकरूची माहिती पोलिसांना न दिल्याबद्दल फ्लॅटमालक विजया अशोक शिवले (रा. भीमा कोरेगाव, जि. पुणे) यांच्यावर कारवाई करणार आहे.
- संतोष गिरीगोसावी, पोलीस निरीक्षक
‘३१ डिसेंबर’ची तयारी ?
कोब्रा व्हेनम म्हणजे, नागाचे विष याची पावडर करून
दारू अथवा इंजेक्शनद्वारे घेतली जाते. याला दिल्ली व गोवा राज्यात मागणी आहे. या पावडरला ङ-७२, ङ-७६ अशी नावे आहेत. हे विष अशा पार्ट्यांमध्ये किंवा साप चावल्यानंतर दिले जाणारे इंजेक्शन बनविण्यासाठी पाठविण्यात येत असल्याचा संशय आहे.
जोखीम पत्करून कुटुंबासह वास्तव्य
आरोपी रणजित खारगे हा पत्नी शैलजा व दोन लहान मुलींसह या फ्लॅटमध्ये राहत होता. त्याने सोसायटीतील गेटवर सर्पमित्र म्हणून पाटी लिहून त्याखाली मोबाईल क्रमांक दिला होता. आरोपी धनाजीसह अजून किती सर्पमित्र त्याला साप पुरवीत होते, ते गुलदस्तात आहे.