केडीसीसी बँकेतच मिळणार पंधरा रुपयात कर्जासाठीचे ७/१२, ८अ उतारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 11:15 IST2021-06-01T11:08:37+5:302021-06-01T11:15:34+5:30
BankingSector Kolhapur : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जासाठी लागणारे ७/१२, ८ अ, नमुना नं. ६ इत्यादी उतारे यापुढे केडीसीसी बँकेतच मिळणार आहेत. यामुळे सरकारी विलंब व चकरा मारण्यापासून शेतकऱ्यांची सुटका होणार असून त्यांना तात्काळ कर्ज मिळणे सोपे झाले आहे.

केडीसीसी बँकेने शेतकऱ्याना कर्जासाठी लागणारे सातबारा, आठ अ, नमुना नंबर सहा हे उतारे मिळण्याची सुविधा बँक पातळीवरच करून दिली आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत अमरापुर विकास सेवा संस्था -औरवाड ता. शिरोळचे सभासद शेतकरी झाकीरहुसेन साहेबहजरत पटेल यांना बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सातबारा उताऱ्यांचे वितरण झाले. यावेळी बँकेचे ज्येष्ठ संचालक व माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार पी. एन. पाटील, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील व प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जासाठी लागणारे ७/१२, ८ अ, नमुना नं. ६ इत्यादी उतारे यापुढे केडीसीसी बँकेतच मिळणार आहेत. यामुळे सरकारी विलंब व चकरा मारण्यापासून शेतकऱ्यांची सुटका होणार असून त्यांना तात्काळ कर्ज मिळणे सोपे झाले आहे.
बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी हा निर्णय जाहीर केला. विकास सेवा संस्थांच्या कर्जदार सभासद शेतकऱ्यांना सातबारा उताऱ्यांचे वितरण करून या उपक्रमाचा प्रारंभ झाला.
यावेळी अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी हा या बँकेचा केंद्रबिंदू आहे. बँकेकडून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जाते. शेतकऱ्यांचा सातबारा उतारा पाहून पीक -पाणी, इतर बोजे इत्यादी बाबी विचारात घेतल्या जातात. परंतु; सातबारा उतारे मिळण्यात होणाऱ्या विलंबामुळे शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळणे अडचणीचे होते. त्यामुळे बँकेने सर्व शाखांमधून ही सुविधा सुरू केली आहे.
बैठकीत अमरापुर विकास सेवा संस्था -औरवाड ता. शिरोळचे सभासद शेतकरी झाकीरहुसेन साहेबहजरत पटेल, यशवंत विकास सेवा संस्था- हुनगिनहाळ -ता. गडहिंग्लजचे सभासद शेतकरी काशिनाथ कल्लाप्पा विभुते व बलभीम विकास सेवा संस्था - माले ता. पन्हाळाचे सभासद शेतकरी संभाजी मारुती पाटील यांना बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व संचालक मंडळाच्या हस्ते सातबारा उताऱ्यांचे वितरण झाले.
बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचनेनुसार जमाबंदी आयुक्त आणि संचालक -भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याशी सामंजस्य करार केला. शेतकऱ्यांना शाखा पातळीवर डिजिटल स्वाक्षरीत अधिकार अभिलेख, ७/१२ व ८ अ उतारे तसेच नमुना नंबर सहा इत्यादी उतारे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. प्रति उतारे पंधरा रुपये शासनाकडे जमा करावयाचे असून याकरीता मनुष्यबळ, नेटवर्किंग, संगणक व स्टेशनरीसाठी येणारा सर्व खर्च बँक स्वभांडवलातून उचलणार आहे.
यावेळी संचालक मंडळातील ज्येष्ठ संचालक व माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार पी. एन. पाटील, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, पी. जी. शिंदे, विलासराव गाताडे, अनिल पाटील, आर. के.पोवार, सर्जेराव पाटील -पेरीडकर, अशोकराव चराटी, प्रताप उर्फ भैय्या माने, असिफ फरास, संतोष पाटील, रणजितसिंह पाटील, श्रीमती उदयानीदेवी साळुंखे आदी सदस्य तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए.बी. माने उपस्थित होते.