दोन महिन्यात परदेशातून आले ७२ नागरिक- अहवाल निगेटिव्ह : इंग्लंडमधील ४ नागरिकांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:19 AM2020-12-26T04:19:12+5:302020-12-26T04:19:12+5:30
कोल्हापूर : ग्रीस, युएस, नॉर्वे, मलेशिया, जर्मन, पोलंड अशा वेगवेगळ्या देशातून गेल्या दोन महिन्यात ७२ नागरिक कोल्हापुरात परतले आहेत. ...
कोल्हापूर : ग्रीस, युएस, नॉर्वे, मलेशिया, जर्मन, पोलंड अशा वेगवेगळ्या देशातून गेल्या दोन महिन्यात ७२ नागरिक कोल्हापुरात परतले आहेत. या सर्वांची जिल्हा प्रशासनाकडे नोंद असून, यापैकी एकही नागरिक कोरोना पॉझिटिव्ह नाही, ही सकारात्मक बाब आहे. गेल्या चार दिवसात इंग्लंडहून ४ नागरिक आले असून, त्यांची सीपीआरला तपासणी करण्यात येणार आहे.
गेले वर्षभर धुमाकूळ घालत असलेल्या कोरोनाचा नवा प्रकार आता युरोपीय देशात आढळून आल्याने राज्य शासनाने गेल्या काही दिवसात परदेशातून राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात परतलेल्या नागरिकांची माहिती संकलनास सुरुवात केली आहे. मार्च महिन्यात कोरोना सुरु झाला तेव्हापासून कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती घेतली जात आहे. त्यांना तपासणी, रिपोर्ट याबद्दल माहिती दिली जाते व नोंदणी करण्यास सांगितले जाते. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापनाच्या कंट्रोल रुममध्ये याबाबतची माहिती संकलित होत आहे.
गेल्या दोन महिन्यात म्हणजेच २२ ऑक्टोबरपासून आजतागायत कोल्हापुरात ७२ नागरिक परदेश प्रवास करुन आले आहेत. आलेल्या नागरिकांचा प्रवास करण्याआधीचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह असला तरी त्यांना कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर पुन्हा सीपीआरमध्ये आरोग्य तपासणी करण्याची सक्ती आहे. हा अहवाल आल्यानंतर त्याची प्रत घेऊन आपत्ती व्यवस्थापनाकडे नोंदणी करायला बोलावले जाते. गेल्या चार - पाच दिवसात इंग्लंडमधून चार व्यक्ती आल्या असून, त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.
----
या देशातून आले नागरिक
कॅनडा, ग्रीस, ओमन, युएस, जर्मन, मलेशिया, कतार, लंडन, नॉर्वे, युके, नेदरलँड, कुवेत, टांझानिया, सौदी अरेबिया, आयर्लंड, इटली, इजिप्त, साऊथ आफ्रिका, केनिया, पोलंड.
----