तीन दिवसांत ७२ हजार मोबाईल आधारला जोडले कोल्हापूर पोस्ट कार्यालयाची तत्परता : ३६ लाखांच्या उत्पन्नासह देशात पुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:29 AM2021-08-14T04:29:01+5:302021-08-14T04:29:01+5:30
कोल्हापूर : डाक विभागाच्या विशेष मोहिमेअंतर्गत आधारकार्डला मोबाईल नंबर लिंक करण्याच्या मोहिमेत जिल्ह्य़ात तीन दिवसांत ७२२११ हजार मोबाईल नंबर ...
कोल्हापूर : डाक विभागाच्या विशेष मोहिमेअंतर्गत आधारकार्डला मोबाईल नंबर लिंक करण्याच्या मोहिमेत जिल्ह्य़ात तीन दिवसांत ७२२११ हजार मोबाईल नंबर आधारशी जोडले आहेत. या कामगिरीत कोल्हापूर डाक विभाग देशात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यातून कोल्हापूर डाक विभागाला ३६ लाख ११हजार ५० रुपये उत्पन्न मिळाले.
भारतीय टपाल कार्यालयाच्या वतीने गेल्या महिन्यापासून मोबाईल नंबर आधारला लिंक करण्याची मोहीम देशभरात चालू केली असून त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर विभागाने ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जिल्ह्य़ात पोस्टमनच्या मदतीने मोबाईल नंबर आधारशी लिंक करण्यासाठी १० ते १२ ऑगस्टदरम्यान पोस्टमन आपल्या दारी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले. याअंतर्गत जिल्ह्य़ातील ७२ हजारांहून अधिक नागरिकांनी आपले मोबाईल नंबर आधारशी लिंक करून घेतले आहेत.
सध्या डाक विभागाच्या वतीने पोस्ट बँकिंग ही संकल्पना देशभरात सुरू असून पोस्ट बँकेत पैसे भरणे, पैसै काढणे, पैसै खात्यावर वर्ग करणे ही सेवा पोस्ट कार्यालयात सुरू होती, पण लॉकडाऊनच्या काळात पोस्टमनच्या मार्फत नागरिकांच्या घरापर्यंत ही सेवा पोहोचवली होती. त्याचाच एक भाग म्हणून डाक कार्यालयाने मोबाईल नंबर आधारशी लिंक करण्यासाठी तीन दिवस विशेष मोहीम राबविली.
----------
प्रतिक्रिया
मोबाईल नंबर आधारशी लिंक करण्याची तीन दिवसांची विशेष मोहीम कोल्हापूर विभागात राबवली. त्यास नागरिकांनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल आम्ही समाधानी असून ही मोहीम इथून पुढेही डाक कार्यालयात चालूच राहणार आहे.
रुपेश सोनावले.
प्रवर डाक अधीक्षक, कोल्हापूर विभाग.
-------------
(फोटो काल पाठवला आहे)