स्टोअरमधून ७३ हजाराचा मोबाइल चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:21 AM2021-03-14T04:21:31+5:302021-03-14T04:21:31+5:30
कोल्हापूर : येथील लक्ष्मीपुरीतील रिलायन्स डिजिटल स्टोअर्स या शोरुममधून चोरट्याने सुमारे ७३ हजार ५९४ रुपये किमतीचा मोबाइल काउंटरवरून नजर ...
कोल्हापूर : येथील लक्ष्मीपुरीतील रिलायन्स डिजिटल स्टोअर्स या शोरुममधून चोरट्याने सुमारे ७३ हजार ५९४ रुपये किमतीचा मोबाइल काउंटरवरून नजर चुकवून चोरी केला. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. याबाबत दुकानमालक सागर गणपती पवार (वय ३० रा. मराठा कॉलनी, कसबा बावडा) यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सीसी टिव्ही फुटेजनुसार चोरटा अंदाजे ३० वय, अंगात भगव्या रंगाचा शर्ट, जीन्स पॅट असल्याचीही माहिती पवार यांनी पोलिसांना दिली.
शहरातून तीन दुचाकींची चोरी
कोल्हापूर : शहरातील विविध तीन ठिकाणांहून दुचाकी चोरीच्या घटना घडल्या. जय अशोक पटेल (वय २८ रा. शांती निवास बी.डब्लू. डी. अपार्टमेंट, टाकाळा) यांनी आपल्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी केलेली सुमारे ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञाताने चोरुन नेली. आयटीआय कॉर्नरनजीक उभी केेेलेली २५ हजार रुपये किमतीची दुचाकी गुरुवारी रात्री अज्ञाताने चोरली, दुचाकीमालक अनुकूल अरुण सुतार (वय ३० रा. फुलेवाडी नाका) यांनी जुना राजवाडा पोलिसात तक्रार दिली. कसबा बावडा येथे विवेक शंकर पवार (रा. माळी गल्ली, पूर्वबाजू, कसबा बावडा) यांनी दारात उभी केलेली लाख रुपये किमतीची दुचाकी अज्ञाताने चोरली. तिन्हीही तक्रारींची पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
बुलेटची दुचाकीस्वाराला धडक
कोल्हापूर : खाटांगळे ते आमशी मार्गावर ॲकॅडमीसमोर भरधाव बुलेटस्वाराने पाठीमागून धडक दिल्याने ज्ञानदेव बाजीराव शिपेकर (वय २५ रा. बोलोली ता. करवीर) हे दुचाकीस्वार जखमी झाले. अपघातानंतर बुलेटस्वार अपघाताची वर्दी न देता पळून गेला. याबाबत जखमी दुचाकीस्वाराला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर करवीर पोलीस ठाण्यात बुलेटस्वारावर गुन्हा नोंद केला आहे.