जयसिंगपूरमध्ये ७४ लाखांची रोकड जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 01:04 AM2019-04-17T01:04:17+5:302019-04-17T01:04:25+5:30
जयसिंगपूर : संभाजीपूर येथे उपसरपंच गौसमहमद अन्वर गवंडी (वय ४७, रा. कचरे सोसायटी, संभाजीपूर) यांच्या गोदामात बेकायदेशीर गुटख्याचा साठा ...
जयसिंगपूर : संभाजीपूर येथे उपसरपंच गौसमहमद अन्वर गवंडी (वय ४७, रा. कचरे सोसायटी, संभाजीपूर) यांच्या गोदामात बेकायदेशीर गुटख्याचा साठा तर जयसिंगपूर शहरातील बाराव्या गल्लीत त्यांच्याच दुकानातून ७४ लाख ६५ हजार २०० रुपयांची बेहिशोबी रोकड मंगळवारी रात्री भरारी पथक व जयसिंगपूर पोलीस यांच्या संयुक्त पथकाने जप्त केली.
या कारवाईत गौसमहमद अन्वर गवंडी (वय ४७, रा. कचरे सोसायटी, संभाजीपूर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. अन्न व औषध भेसळ विभागाकडून रात्री उशिरापर्यंत गुटखा साठ्याची मोजदाद सुरू होती. तर आयकर विभागाचे कर्मचारी रात्री उशिरापर्यंत याबाबत खात्री करत होते. जयसिंगपूरचे सपोनि नामदेव शिंदे यांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीमुळे गुटखा साठा त्याबरोबर बेहिशोबी रक्कम जप्त करण्यात आली.
याबाबत भरारी पथक व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खबºयामार्फत मिळालेल्या माहितीनुसार संभाजीपूर येथील गवंडी यांच्या गोदामात ४० लाख रुपयांचा गुटखा असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांच्या पथकाने त्याठिकाणी छापा टाकला असता गुटख्याचा साठा मिळाला.ही कारवाई सुरू असताना गवंडी यांच्या मालकीच्या जयसिंगपूर येथील बाराव्या गल्लीतील गवंडी टोबॅको दुकानावर देखील छापा टाकण्यात आला. यावेळी दुकानातून एक महिला तीन बॅगा घेऊन जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. दुकानासमोर असलेल्या एका घरात या बॅगा त्या महिलेने टाकल्या होत्या. पथकाने तत्काळ या बॅगा ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यामध्ये रोकड मिळून आली.
त्याची मोजदाद केल्यानंतर सुमारे ७४ लाख ६५ हजार २०० रुपये बेहिशोबी रक्कम असल्याचे पथकाने सांगितले. रात्री उशिरापर्यंत पथकाकडून गुटख्याची मोजदाद सुरू होती. गोडावूनमध्ये मोठ्या प्रमाणात सुपारीचा साठादेखील सापडला आहे. केंद्रीय जीएसटी पथकाला याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
पैशांची चौकशी होणार
भरारी पथक व जयसिंगपूर पोलिसांच्या कारवाईत ७४ लाख ६५ हजार २०० रुपयाची बेहिशोबी रक्कम सापडली असून रक्कमेबाबत आयकर विभागाला माहिती देण्यात आली. हे पैसे निवडणुकीत वाटण्याकरीता आणण्यात आले होते का, ही माहिती आयकर विभागाच्या तपासणी अहवालानंतरच पुढे येणार आहे, असे तहसीलदार गजानन गुरव व सपोनि नामदेव शिंदे यांनी दिली.