यंत्रमाग वीज ग्राहकांना ७५ कोटी रुपयांचा परतावा
By Admin | Published: April 6, 2016 12:32 AM2016-04-06T00:32:19+5:302016-04-06T00:40:39+5:30
हाळवणकर : ९१ पैशांच्या फरकाने बिले येणार; संघर्षाला यश
इचलकरंजी/मुंबई : राज्यातील यंत्रमाग वीज ग्राहकांच्या वीज बिलातून चुकीच्या पद्धतीने झालेली इंधन समायोजन आकाराची (एफएसी) आकारणी रद्द करण्यात आली असून, ती ग्राहकांना परत करण्याचे परिपत्रक अखेर मंगळवारी महावितरणने प्रसिद्ध केले. या निर्णयामुळे यंत्रमाग ग्राहकांना ७५ कोटी रुपये परत मिळणार असून, यंत्रमाग ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिली.
ते म्हणाले, महाराष्ट्र शासनाने २०१५ मध्ये यंत्रमाग वीज ग्राहकांसाठी वेगळी वर्गवारी केली. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर ग्रामपंचायत, नगरपालिका याप्रमाणे यंत्रमागाची वेगळी वर्गवारी होऊन २.६६ रु. हा सवलतीचा वीजदर लागू झाला; परंतु इंधन समायोजन आकार या हेडखाली आॅक्टोबर २०१५ पासून महावितरणने २७ एचपीपर्यंतचा यंत्रमाग वीज ग्राहकांकडून प्रती युनिट ५० पैसे व २७ एचपीवरील वीज ग्राहकांकडून प्रती युनिट ७५ पैसे इतका दर चुकीच्या पद्धतीने लावून आकारणी करण्यात आली. त्यामुळे यंत्रमाग वीज ग्राहकांकडून ७५ कोटीपेक्षा जादा रकमेची वसुली झाली. ही बाब आमदार सुरेश हाळवणकर यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निदर्शनास आणली. त्यावर ऊर्जामंत्र्यांनी महावितरणचे अधिकारी व ऊर्जा सचिव यांच्यासह १६ मार्च २०१६ रोजी संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत ऊर्जामंत्र्यांनी जादाची वसुली केलेली रक्कम राज्यातील यंत्रमाग ग्राहकांना परत देण्याचे आदेश दिले. तोपर्यंत मार्च महिन्यातील नवीन वीज बील वाटपाला स्थगिती दिली. या बैठकीनंतरही सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर मंगळवारी महावितरणने परिपत्रक जारी केले.
यंत्रमाग ग्राहकांना पुढील पाच महिन्यांच्या बिलांमधून ७५ कोटी रुपये रिफंड स्वरूपात देण्यात येतील. आता येणारी बिले २७ एचपी खालील यंत्रमाग ग्राहकांना प्रती युनिट ९१ पैसे फरकाने येतील. तर २७ एचपी वरील वीज ग्राहकांना १.३० रु. प्रती युनिट इतक्या कमी दराने वितरित होतील. ही स्थिती पुढील पाच महिने राहील.