कोल्हापूर रेल्वेस्थानकाचे रूपडे पालटू लागलेय; २५ टक्के काम बाकी
By संदीप आडनाईक | Updated: April 16, 2025 12:45 IST2025-04-16T12:44:23+5:302025-04-16T12:45:29+5:30
प्रतीक्षालय, शौचालयाचे काम महिनाअखेरीपर्यंत होणार पूर्ण

कोल्हापूर रेल्वेस्थानकाचे रूपडे पालटू लागलेय; २५ टक्के काम बाकी
संदीप आडनाईक
कोल्हापूर : अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत कोल्हापूररेल्वे स्थानकाचे रूपडे पालटू लागले आहे. वर्षभरात ७५ टक्के काम पूर्ण केले असून अद्याप २५ टक्के काम बाकी आहे. या स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारकडून ४३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या योजनेतील देशभरातील कामांचे भूमिपूजन ६ ऑगस्ट २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले होते.
कोल्हापूर रेल्वे स्थानकावर ४३ कोटी ३ लाखांच्या निधीतून विकासकामे सुरू झाली आहेत. या अमृत भारत विकास योजनेतून पुणे विभागातील कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, कऱ्हाड, सातारा, वाठार, लोणंद, तळेगाव, देहू रोड, आकुर्डी, चिंचवड, हडपसर, उरुळी, कडगाव, बारामती आणि फलटण या स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे.
ही कामे झालीत पूर्ण
कोल्हापूर रेल्वे स्थानकाचे प्रांगण, तिकीट बुकिंग काउंटर, एटीव्हीएम सुविधा, नव्याने तयार केलेल्या कक्षात विद्यमान बुकिंग काउंटर स्थलांतर, प्रवेश लॉबी, मुख्य प्रवेशद्वार आणि द्वितीय प्रवेशद्वारांवर स्वतंत्र कव्हर पार्किंग, रस्ता रुंदीकरण, लँडस्केपिंग, रस्ता पृष्ठभाग, पादचारी मार्गाचे नूतनीकरण
विस्तारीकरण बाकी..
कोल्हापूर रेल्वेस्थानकाचे विस्तारीकरण आणि आधुनिकीकरण करून लूक बदलता येणे शक्य आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्समध्ये मुबलक जागा उपलब्ध आहेत. त्याचा योग्य वापर केल्यास कोल्हापूरचे रेल्वेस्थानक मॉडेल बनू शकते. कोल्हापूर मिरज पुणे मार्गावरील दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाला गती मिळाली आहे; परंतु त्याचे काम मार्च संपले तरी बाकी आहे. या रेल्वेस्थानकावरून जादा रेल्वेगाड्या धावण्यासाठी आणि पार्किंगसाठी जादा प्लॅटफार्मची गरज आहे. कोल्हापूर रेल्वे स्थानक मॉडेल करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, गेल्या अनेक वर्षांत त्यादृष्टीने हालचाली झाल्याच नाहीत, आता विद्युतीकरणाचा पाठपुरावा करण्याबरोबरच मॉडेल रेल्वेस्थानकासाठी हालचाली गतिमान केल्या पाहिजेत.
अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत अजूनही विविध कामांची अंमलबजावणी बाकी असून त्याचे काम गती शक्ती युनिटकडे सोपवले आहे. या योजनेंतर्गत पुणे विभागातील विविध विकासकामांना यापूर्वीच मंजुरी देण्यात आली असून, अंमलबजावणीसाठी एजन्सी नेमलेली आहे. त्यांच्याकडून अजून काही कामे पूर्णत्वाकडे जात आहेत. -आर. के. मेहता, स्थानकप्रमुख, कोल्हापूर.