बँकांच्या संपामुळे ७५० कोटींचा व्यवहार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 06:17 PM2021-03-15T18:17:09+5:302021-03-15T18:20:26+5:30
Banking Sector Kolhapur-मोदी सरकारने आयडीबीआय आणि दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणाच्या विरोधात राष्ट्रीयीकृत बँकातील कर्मचारी सोमवारपासून दोन दिवसांच्या संपावर आहेत. जिल्ह्यातील १७० बँकांच्या १५० पेक्षा जास्त शाखांमधील पाच हजार कर्मचारी यामध्ये सहभागी झाल्याने बँका बंद राहिल्या. क्लिअरिंग, कॅश बंद राहिल्यामुळे दिवसभरात सुमारे ७५० कोटींचे व्यवहार ठप्प झाले. दरम्यान, सकाळी सर्व राष्ट्रीयीकृत बँकांच्या दारात बँक कर्मचाऱ्यांनी मूक निदर्शने करून मोदी सरकारचा निषेध केला.
कोल्हापूर : मोदी सरकारने आयडीबीआय आणि दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणाच्या विरोधात राष्ट्रीयीकृत बँकातील कर्मचारी सोमवारपासून दोन दिवसांच्या संपावर आहेत. जिल्ह्यातील १७० बँकांच्या १५० पेक्षा जास्त शाखांमधील पाच हजार कर्मचारी यामध्ये सहभागी झाल्याने बँका बंद राहिल्या. क्लिअरिंग, कॅश बंद राहिल्यामुळे दिवसभरात सुमारे ७५० कोटींचे व्यवहार ठप्प झाले. दरम्यान, सकाळी सर्व राष्ट्रीयीकृत बँकांच्या दारात बँक कर्मचाऱ्यांनी मूक निदर्शने करून मोदी सरकारचा निषेध केला.
देशातील १२ सार्वजनिक क्षेत्रातील, १२ जुन्या जमान्यातील खासगी, ६ विदेशी, ५६ प्रादेशिक ग्रामीण बँकांतील कर्मचारी आणि अधिकारी संपात सहभागी झाले. कोल्हापूर जिल्ह्यातही बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निदर्शने, धरणे, मेळावे इत्यादी कार्यक्रमांना जिल्हा प्रशासनाने बंदी घातल्याने राष्ट्रीयीकृत बँकांतील कर्मचाऱ्यांनी शाखेच्या दारात मूक निदर्शने केली.
लक्ष्मीपुरीतील बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर सर्व कर्मचारी एकत्र येऊन निदर्शने केली. राष्ट्रीयीकृत बँकांच्या खासगीकरणाचे तोटे सांगणाऱ्या माहिती पत्रकाचे वाटप परिसरात केले. यावेळी विकास देसाई, रमेश कांबळे, सुहास शिंदे, प्रमोद शिंदे, चंद्रकांत गुडस्कर, विवेककुमार आदी उपस्थित होते.
बँकांचा संप १०० टक्के यशस्वी झाला. राज्यात १० हजार शाखांचे शटरही उघडले नाही. कॅश, क्लिअरिंग ठप्प होते. कोरोनामुळे मेळावे, धरणे, मोर्चा, आंदोलन करता आले नसले तरी प्रत्येक शाखेतील ५ कर्मचाऱ्यांच्या गटाने परिसरातील भाजी मंडई, बाजारपेठेत जाऊन बँक खासगीकरणाचे तोटे काय आहेत, याच्या माहितीपत्रकाचे वाटप केले. मंगळवारीही अशाच प्रकारे आंदोलन राहील. पुढील आठवड्यात युनायटेड फोरमची मीटिंग होणार असून, पुढील आंदोलन तीव्र करण्याबाबत रणनीती ठरविली जाईल.
देवीदास तुळजापूरकर,
निमंत्रक युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन