‘पगारी पुजारी’मुलाखतीसाठी ७६ उमेदवार पात्र, बुधवारपासून प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 02:46 PM2019-02-16T14:46:15+5:302019-02-16T14:47:11+5:30
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे श्री अंबाबाई मंदिरात नेमण्यात येणाऱ्या पगारी पुजारी पदासाठी इच्छुक उमेदवारांची मुलाखत बुधवार (दि. २०)पासून घेण्यात येणार आहे. या मुलाखतीसाठी ७३ पुरुष व चार महिला उमेदवार पात्र ठरले आहेत.
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे श्री अंबाबाई मंदिरात नेमण्यात येणाऱ्या पगारी पुजारी पदासाठी इच्छुक उमेदवारांची मुलाखत बुधवार (दि. २०)पासून घेण्यात येणार आहे. या मुलाखतीसाठी ७३ पुरुष व चार महिला उमेदवार पात्र ठरले आहेत.
पगारी पुजारी नियुक्तीसाठी समितीने तीन तारखेला जाहिरात प्रसिद्ध करून उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, २५२ जणांनी या पदासाठी अर्ज केला आहे. या अर्जांच्या छाननीनंतर मुलाखतीसाठी ७३ पुरुष व चार महिला उमेदवार पात्र ठरले आहेत.
या उमेदवारांची यादी समितीच्या शिवाजी पेठेतील मुख्य कार्यालयात लावण्यात आली आहे. समितीच्या वतीने शनिवारपासून उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार होत्या. मात्र त्या पुढे ढकलण्यात आल्या असून, नव्या नियोजनानुसार २०, २१ व २२ या तारखांला टेंबलाईवाडी यात्री निवास येथे सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत या मुलाखती होतील. पात्र उमेदवारांना एसएमएस व मुलाखतीचे पत्र पाठविण्यात आले आहे.