कोल्हापूर जिल्हा परिषदेतील ७७ जणांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 12:22 PM2019-05-30T12:22:14+5:302019-05-30T12:23:38+5:30
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या चार विभागांतील कर्मचाऱ्यांच्या बुधवारी समुपदेशनातून बदल्या करण्यात आल्या. यामध्ये सामान्य प्रशासन, प्राथमिक शिक्षण, ग्रामपंचायत आणि कृषी विभागातील एकूण ७७ बदल्या करण्यात आल्या. आज, गुरुवारीही उर्वरित विभागांच्या बदल्या करण्यात येणार आहेत.
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या चार विभागांतील कर्मचाऱ्यांच्या बुधवारी समुपदेशनातून बदल्या करण्यात आल्या. यामध्ये सामान्य प्रशासन, प्राथमिक शिक्षण, ग्रामपंचायत आणि कृषी विभागातील एकूण ७७ बदल्या करण्यात आल्या. आज, गुरुवारीही उर्वरित विभागांच्या बदल्या करण्यात येणार आहेत.
उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, समाजकल्याण सभापती विशांत महापुरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ, राजेंद्र भालेराव, जिल्हा कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यावेळी उपस्थित होते. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी, अधीक्षक, विस्तार अधिकारी, वरिष्ठ, कनिष्ठ सहायक अशा ५२ जणांच्या बदल्या करण्यात आल्या.
शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख अशा दोघांच्या आणि ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, पंचायत विस्तार अधिकारी अशा १७ जणांच्या बदल्या करण्यात आल्या. कृषी विभागाच्या सहा बदल्या करण्यात आल्या. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेने जाहीर केलेला बदली कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर बुधवारी समिती सभागृहामध्ये ही प्रक्रिया पार पाडली.
माध्यमिकच्या बदल्यांवरून मतभेद
दरम्यान, माध्यमिक शिक्षण विभागातील बदल्यांवरून अमन मित्तल आणि रविकांत आडसूळ यांच्यामध्ये मतभेद झाल्याचे समजते. बदलीची कारवाई करायची असेल तर अशा कर्मचाऱ्यांना या समुपदेशन प्रक्रियेमध्ये घेता येणार नाही. त्यांची चौकशी करून अहवाल आल्यानंतर त्यांची बदली करावी लागेल, अशी भूमिका आडसूळ यांनी मांडली; तर ‘आत्ताच्या आत्ता बदल्या करा. तसे स्थायीमध्ये ठरले आहे,’ असे सांगत मित्तल यांनी चौघांच्या बदल्या केल्या. अपंग कर्मचाऱ्यांना सूट असतानाही प्रक्रियेसाठी बोलावून घेतल्याने अनेकांनी यावेळी नाराजी व्यक्त केली.