कोल्हापूर जिल्ह्यात ७७%मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2017 01:19 AM2017-02-22T01:19:36+5:302017-02-22T01:19:36+5:30
पन्हाळा, कागल, गगनबावडा आणि राधानगरी या चार तालुक्यांमधील मतदानाची टक्केवारी ८० टक्क्यांपेक्षा जास्त असून
कोल्हापूर : अतिशय अटीतटीने आणि ईर्ष्येने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी ७७ टक्के मतदान झाले. यंदा प्रथमच पक्षीय संघर्ष तीव्र झाल्याने गेल्या वेळेपेक्षा मतदानाच्या टक्केवारीमध्ये पावणेदोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. काही ठिकाणी संध्याकाळी एकदम गर्दी वाढल्याने रात्रीपर्यंत मतदान सुरू होते. जिल्ह्यातील ९०५ उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद झाले असून, त्यांचा फैसला आता उद्याच (गुरुवारी) होणार आहे. कुशिरे व महे येथील हाणामारीचे प्रसंग वगळता बहुतांश ठिकाणी मतदान शांततेत झाले. जिल्ह्यात सर्वाधिक मतदान गगनबावडा तालुक्यात (८८.४४ टक्के), तर सर्वांत कमी चंदगड तालुक्यात (६९.३६ टक्के) झाले.
पन्हाळा, कागल, गगनबावडा आणि राधानगरी या चार तालुक्यांमधील मतदानाची टक्केवारी ८० टक्क्यांपेक्षा जास्त असून आजरा, गडहिंग्लज आणि चंदगड या जुन्या उपविभागांमध्ये मात्र मतदानाची टक्केवारी तुलनेने कमी दिसत आहे. जिल्हा परिषदेच्या ६७ आणि पंचायत समितीच्या १३४ जागांसाठी मंगळवारी सकाळी साडेसातपासून मतदानाला सुरुवात झाली. ऊन होण्याआधी मतदान करण्याकडे कल असल्याने अनेकांनी शाळाशाळांमध्ये मतदानासाठी मोठी गर्दी केली होती. मतदान करून कामाला लागायचे, या भूमिकेतून महिला तर मोठ्या संख्येने रांगेत उभारल्याचे चित्र जिल्हाभर दिसत होते. सकाळी अकरा वाजेपर्यंत हेच चित्र दिसत होते. नंतर मात्र दुपारच्या वेळी मतदानाचे प्रमाण संथ झाले.
ग्रामीण भागातही उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने मतदारांनी भर दुपारी मतदानाला येणे टाळले. मात्र, काही ठिकाणी दुपारी गर्दी कमी असते, म्हणूनही मतदानासाठी गर्दी केली होती. पुन्हा दुपारी तीननंतर मात्र अनेक मतदान केंद्रांवर रांगा दिसू लागल्या. कार्यकर्त्यांनी हातामध्ये याद्या घेऊनच राहिलेल्या मतदारांना गाड्यांमध्ये घालून आणण्याचा सपाटा लावल्याने मतदान केंद्रांच्या आवारात संध्याकाळी पुन्हा गर्दी दिसू लागली. काही ठिकाणी तर मतदानाची वेळ संपली तरी गर्दीच असल्याने परिसरातील मतदारांना आत घेऊन गेट बंद करण्यात आले. यानंतर रात्रीपर्यंतही काही ठिकाणी मतदान सुरू ठेवावे लागले. (प्रतिनिधी)
चंदगड तालुक्यात सर्वांत कमी मतदान
पन्हाळा, कागल, गगनबावडा, राधानगरी तालुक्यांत ८० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान
गर्दी वाढल्याने काही भागात रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया
उद्या मतमोजणी
उद्या, गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दुपारी चार वाजेपर्यंत तालुक्याचा पूर्ण निकाल लागेल, असा अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. गगनबावडा तालुक्याचा निकाल सर्वांत लवकर लागण्याची चिन्हे आहेत.
अनेक ठिकाणी व्होटर्स स्लिप नसल्याने गोंधळ
कोल्हापूर दक्षिणमधील पाचगावसह कळंबा तर्फ ठाणे येथे व्होटर्स स्लिप न मिळाल्याने अनेक मतदारांची धांदल उडाली. तसेच जिल्ह्यात अनेक ठिकाणी याआधी जिथे मतदान होत होते, तिथली नावे दुसऱ्याच केंद्रात समाविष्ट केल्याचे समोर आले. त्यामुळे मतदारांना नावे शोधताना कसरत करावी लागली. त्यामुळे काही ठिकाणी या केंद्रावरून त्या केंद्रावर फिरावे लागल्याने संताप व्यक्त करून काहींनी मतदान करण्यापेक्षा घरी जाणे पसंत केले.
मतदानाचा
टक्का वाढला
गेल्या निवडणुकीत सरासरी ७५.२४ टक्के इतके मतदान होऊन त्यामध्ये १९ लाख ६९ हजार ९६ मतदारांपैकी १४ लाख ८१ हजार ७७५ जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यंदा यामध्ये पावणेदोन टक्क्यांची वाढ झाली आहे. जिल्ह्यातील २४५१ मतदान केंद्रांंवर २१ लाख ३८ हजार ८० मतदारांपैकी १६ लाख ४२ हजार ६५० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष ८ लाख ८७ हजार १९४ आणि स्त्री ७ लाख ८७ हजार ४५६ एवढ्या मतदारांचा समावेश आहे.
कुशिरेत सरपंचाकडून पोलिसाला मारहाण
पोहाळे तर्फ आळते/ देवाळे : कुशिरे तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर वारंवार ये-जा करण्यास अटकाव केल्याने कोडोली पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल अभिजित शिपुगडे यांना सरपंच विष्णू गणपती पाटील आणि त्यांच्या साथीदारांनी बेदम मारहाण केली. यात शिपुगडे जखमी झाले असून, त्यांचा गणवेशही फाटला आहे. मंगळवारी सकाळी ९.३0 वा. च्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी विष्णू पाटील व काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. - वृत्त/३
मतदार आणण्यावरून बानगेत बाचाबाची
कागल : बानगे (ता. कागल) येथे मतदारांना केंद्रावर आणण्याच्या कारणावरून सिद्धनेर्ली जि. प. च्या उमेदवार वृषाली पाटील यांचे पती रवींद्र पाटील व म्हाकवे पं. स. च्या उमेदवार मनीषा सावंत यांचे पती संग्राम सावंत यांच्यामध्ये मतदान केंद्रासमोर वाद झाला. - वृत्त/३
महे येथे मारामारी
सावरवाडी : निवडणुकीत मतदान केंद्रावर बोगस मतदानास अटकाव केला म्हणून महे (ता. करवीर) येथे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांत मारामारी झाली. ही घटना मंगळवारी घडली. यामुळे तणाव निर्माण झाला. - वृत्त/३