जिल्ह्यातील ७७८ गावे कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:29 AM2021-08-13T04:29:03+5:302021-08-13T04:29:03+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील १२२५ गावांपैकी ७७८ गावे कोरोनामुक्त झाली आहेत; त्यामुळे या गावांमध्ये शाळा ...
कोल्हापूर : जिल्ह्यातील १२२५ गावांपैकी ७७८ गावे कोरोनामुक्त झाली आहेत; त्यामुळे या गावांमध्ये शाळा सुरू करण्यासाठीची प्राथमिक तयारी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी गुरुवारी दिली.
चव्हाण म्हणाले, जिल्ह्यात जरी १०२५ ग्रामपंचायती असल्या तरी प्रत्यक्षात १२२५ गावे आहेत. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेचा परिणाम आणि संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाल्याने बहुतांश गावांमध्ये कोरोनाची लागण झाली. मात्र त्यानंतर संपर्कशोध मोहीम प्रभावीपणे राबविणे, आवश्यकता असेल तेथे ॲन्टिजन चाचण्या करणे यांवर भर देण्यात आला. ज्या गावांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे, अशा ठिकाणी अधिक लक्ष दिले गेले. परिणामी आता कोरोनामुक्त गावांची संख्या वाढत आहे. गेल्या १५ दिवसांमध्ये या ठिकाणी एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही, अशा गावांची संख्या ७७८ झाली आहे.
प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत चव्हाण म्हणाले, या कोरोनामुक्त गावांमध्ये जवळपास एक हजार प्राथमिक शाळा आहेत. या ठिकाणी शाळा सुरू करण्यासाठीची प्राथमिक तयारी करण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या कोरोनाविषयक टास्क फोर्सच्या सूचनांनुसार आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.
शिक्षकांच्या बदल्यांचा विषय नेहमी अधिक चर्चेत असतो. याबाबत वेगवेगळ्या शासन आदेशांचे वेगवेगळे अर्थ लावले जातात. वेगवेगळ्या संघटना त्यानुसार आपल्या मागण्या करतात; म्हणूनच सर्वांना एकत्रित चर्चा करण्याचे आवाहन करून शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता पदाधिकारी व संघटना प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली आहे. त्यातून चांगला निर्णय होईल, असे चव्हाण म्हणाले.
चौकट
तालुकावार कोरोनामुक्त गावे
अ.नं. तालुका एकूण गावे कोरोनामुक्त गावे शिल्लक गावे
१ गगनबावडा ४५ ४२ ३
२ भुदरगड ११४ १०९ ५
३ राधानगरी ११७ ९० २७
४ शाहूवाडी १३३ १०५ २८
५ चंदगड १५५ १२५ ३०
६ आजरा ९५ ५९ ३६
७ कागल ८४ ४६ ३८
८ पन्हाळा १३० ८८ ४२
९ शिरोळ ५२ ९ ४३
१० गडहिंग्लज ११० ५८ ५२
११ हातकणंगले ६० ५ ५५
१२ करवीर १३० ४२ ८८
एकूण १२२५ ७७८ ४४७
चौकट
करवीर तालुक्यात ८८ गावांत रुग्ण
जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण सध्या करवीर तालुक्यात आहेत. ८८ गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण असून ४२ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. हातकणंगले तालुक्यात तर केवळ पाच गावे कोरोनामुक्त असून ५५ गावांमध्ये अजूनही कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. गडहिंग्लज तालुक्यातही अजून ५२ गावांमध्ये, तर पन्हाळा तालुक्यात ४२ गावांमध्ये अजूनही रुग्ण आहेत.