‘भोगावती’साठी ७८ टक्के मतदान
By admin | Published: April 24, 2017 01:01 AM2017-04-24T01:01:29+5:302017-04-24T01:01:29+5:30
‘भोगावती’साठी ७८ टक्के मतदान
भोगावती : परिते (ता. करवीर) येथील भोगावती साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी २१ जागांसाठी अत्यंत चुरशीने पण तितकेच शांततेत ३० हजार ५१८ पैकी २४ हजार १६४ मतदान (७८ टक्के) झाले. आज, सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून रमणमळा, कसबा बावडा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे. साधारणत: सायंकाळी पाचनंतर निकालाचा कल स्पष्ट होईल, असा अंदाज आहे. ७४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.
राजर्षी शाहू आघाडी, दादासाहेब पाटील-कौलवकर महाआघाडी व परिवर्तन आघाडी अशी तिरंगी लढत झाली. २१ जागांसाठी ७४ उमेदवार रिंगणात होते. रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून ५८ गावांतील केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच असली तरी काही शाब्दिक चकमकवगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सकाळी दहापर्यंत मतदान केंद्रांबाहेर रांगा लागल्या होत्या. आज, सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात होणार असून दुपारी दोनपर्यंत मतपत्रिकांचे एकत्रिकरणाचे काम सुरू राहणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष मोजणीस सुरुवात होणार असून साधारणत: निकालाचा कल सायंकाळी पाचनंतर स्पष्ट होईल, असा अंदाज निवडणूक यंत्रणेचा आहे.
प्रमुख गावांत झालेले मतदान (कंसात एकूण मतदान)
गुडाळ ८०४ (१०२०), पिरळ ३७३ (४४१), कंथेवाडी ३२० (४७५), अणाजे ३४० (४४८), मुसळवाडी ३१६ (४५५), कुर्डू ४९० (६४२), कौलव ७७३ (१०१४), कसबा तारळे ७३५ (९३४), हसूर ६४६ (८२१), कांचनवाडी २६५ (३५५), सोनाळी २८८ (३६०), म्हालसवडे ५४२ (६३७), कोथळी ७०० (१०४५), खिंडी व्हरवडे २३८ (४३७), शिरगांव ५९८ (८०१), कुरूकली ७१२ (१०२३), तरसंबळे ३१६ (४५५), ठिपकुर्ली ९३३ (११०७), राशिवडे ११२५ (१४८६).
तरुणांची गर्दी
कारखान्याचे जुने व वयस्कर मतदार असल्याने त्यांचे मतदान घरातील तरुण मंडळीच करत होती. भोपळवाडी येथील हरि दत्तू भोपळे (वय १०५) यांनी मतदानाचा हक्क बजावला.
संस्था गटात काटा लढत
संस्था गटातील निवडणूक चुरशीने झाले असून ४६८ पैकी ४६० मतदान झाले. या गटात महाआघाडी व शाहू आघाडीने विजयाचा दावा केल्याने या निकालाकडे लक्ष लागले आहे.