सांगली जिल्हा परिषदेसाठी ७८४ अर्ज
By admin | Published: February 7, 2017 01:11 AM2017-02-07T01:11:02+5:302017-02-07T01:11:02+5:30
मिरज, वाळवा, आटपाडीत गर्दी : भाजप, काँगे्रस, राष्ट्रवादीमध्ये बंडखोरीची चिन्हे; पंचायत समितीसाठी १३०६ अर्ज
सांगली : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ६० जागांसाठी ७८४, तर पंचायत समितींच्या १२० जागांसाठी १३०६ अर्ज दाखल झाले आहेत. मिरज, वाळवा आणि आटपाडी तालुक्यातून सर्वाधिक अर्ज आहेत. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी तासगाव, मिरज आणि खानापूर तालुक्यांमध्ये एबी फॉर्म स्वीकारण्यावरून प्रशासन आणि कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ वादावादीचे प्रकार घडले.
तासगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहा जागांसाठी ११५, तर पंचायत समितीच्या ११२ जागांसाठी १३० अर्ज दाखल आहेत. भाजपकडून जिल्हा परिषद मांजर्डे, सावळज गट आणि पेड, सावळज, बोरगाव, मणेराजुरी, येळावी, कुमठे येथील पंचायत समिती गणातील उमेदवारांना कोरेच एबी फॉर्म देण्यात आले. तेही वेळेत दिले नसल्याची राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तक्रार केली. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. प्रशासनही पेचात सापडले होते. अखेर दोन जिल्हा परिषद आणि सहा पंचायत समितीचे एबी फॉर्म रद्द केल्याचा निर्णय देण्यात आला. त्यामुळे भाजपच्या येथील उमेदवारांना अन्य चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. मिरज तालुक्यातील ११ जागांसाठी १३० आणि पंचायत समितीच्या २२ जागांसाठी २१० अर्ज दाखल झाले.
खानापूर तालुक्यातही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी एबी फॉर्मच दिले नसल्यामुळे प्रशासनाचा गोंधळ निर्माण झाला. येथील जिल्हा परिषदेच्या तीन जागांसाठी ३२ आणि पंचायत समितीच्या सहा जागांसाठी ७१ अर्ज दाखले झाले आहेत. आटपाडी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार जागांसाठी विक्रमी १३३ आणि पंचायत समितीच्या आठ जागांसाठी १७५ अर्ज दाखल झाले. अनेक उमेदवारांनी दोन अर्ज दाखल केल्यामुळे अर्जांची संख्या जास्त दिसत आहे. मंगळवारी (दि. ७) छाननी असून त्यानंतर इच्छुकांची संख्या कमी होणार आहे. (प्रतिनिधी)
दिवसभरातील घडामोडी आणि लढती...
- काँग्रेसच्या मदनभाऊ-विशाल पाटील गटामधील मिरज तालुक्यातील संघर्ष अखेरच्याक्षणी मिटला.
- मिरज पूर्व भागात काँग्रेस, राष्ट्रवादी, अजितराव घोरपडे आघाडी, तर मिरज पश्चिममध्ये काँग्रेससोबत स्वाभिमानी शेतकरी संघटना.
- रयत विकास आघाडीची फारकत घेत वाळव्यात जिल्हा परिषदेच्या तीन आणि पंचायत समितीच्या दहा जागांवर काँग्रेस स्वबळावर, शिवसेना व राष्ट्रवादी स्वतंत्र.
- आटपाडीत राजेंद्रअण्णा देशमुख गटाची भाजपमधून उमेदवारी. शिवसेना स्वतंत्र, तर काँग्रेस व राष्ट्रीय समाज पक्ष आणि स्वाभिमानी विकास आघाडी एकत्र.
- खानापुरात दोन्ही काँग्रेस, भाजपची चिन्हे गोठवून आघाडी; शिवसेना स्वतंत्र
- कवठेमहांकाळला राष्ट्रवादी व अजितराव घोरपडे गटाची आघाडी, मात्र ते पक्षाच्या चिन्हावर लढणार; भाजपची चिन्ह गोठवत काँग्रेसशी आघाडी
- जतला जनसुराज्य-काँग्रेस युती, काँग्रेसच्या वसंतदादा आघाडीची राष्ट्रवादीबरोबर आघाडी, भाजप स्वतंत्र
- पलूस-कडेगावमध्ये काँग्रेसविरोधात भाजप व राष्ट्रवादीची आघाडी
- तासगाव तालुक्यात राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस अशी लढत
- शिराळा तालुक्यात काँग्रेस-राष्ट्रवादी विरूध्द भाजप