पन्हाळागडावर शनिवारी ३६ वा शाहिरी लोककला महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 12:06 PM2020-02-06T12:06:17+5:302020-02-06T12:11:40+5:30
कोल्हापूर : किल्ले पन्हाळागड येथे ३६ वा ‘किल्ले पन्हाळा पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रीय शाहिरी, भेदिक शाहिरी आणि विविध लोककला महोत्सव २०२०’चे शनिवारी ...
कोल्हापूर : किल्ले पन्हाळागड येथे ३६ वा ‘किल्ले पन्हाळा पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रीय शाहिरी, भेदिक शाहिरी आणि विविध लोककला महोत्सव २०२०’चे शनिवारी (दि. ८) सायंकाळी पाच वाजता आयोजित केला आहे.
पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषद, सुरभि सांस्कृतिक एवं सामाजिक युवा संगठन व जनसुराज्य शक्ती सांस्कृतिक युवा मंचच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात राष्ट्रीय शाहिरी, भेदिक, कलगी तुरा, वारकरी दिंडी हे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, अशी माहिती ‘सुरभि सांस्कृतिक’चे प्रा. आनंद गिरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
‘गावगाड्याच्या पाऊलखुणा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून महोत्सवाचे उद्घाटन आमदार विनय कोरे यांच्या हस्ते व पन्हाळा नगराध्यक्ष रूपाली धडेल यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.
यावेळी करणसिंह गायकवाड आणि जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती अमरसिंह पाटील, मुख्याधिकारी कैलास चव्हाण, ‘सुरभि’चे अध्यक्ष विश्वास पाटील, नगरपरिषदेचे पक्षप्रतोद दिनकर भोपळे, उपनगराध्यक्ष चैतन्य भोसले, आशिष पाटील, आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. शनिवारी सायंकाळी सुरू होणारा हा महोत्सव रविवारी पहाटेपर्यंत अखंडपणे सुरू राहणार आहे.
महोत्सवात कोल्हापूरसह पुणे, सातारा, सांगली येथील १५० हून अधिक शाहीर, लोककलावंत उपस्थित राहून कला सादर करणार आहेत. महोत्सवात प्रत्येक शाहीर, लोककलावंताला फेटा, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात येणार आहे; तर २५ शाहिरांचा ‘पन्हाळाभूषण’ने गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या पत्रकार परिषदेस शाहीर शहाजी माळी, रवींद्र धडेल, शाहीर विजय जाधव, आदी उपस्थित होते.