'कोल्हापुरा'त ८ पदवीधर, 'हातकणंगले'त चौघे दहावी पास; लोकसभेच्या रिंगणातील उमेदवारांचे तपासले शिक्षण
By पोपट केशव पवार | Published: April 25, 2024 01:24 PM2024-04-25T13:24:48+5:302024-04-25T13:25:50+5:30
शाहू छत्रपती यांची इंदूरमधून पदवी, संजय मंडलिक एम.ए.बी.एड; कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभा उमेदवारांचे शिक्षण किती..जाणून घ्या
पोपट पवार
कोल्हापूर : राजकारण आणि शिक्षण यांचा तसा फारसा संबंध येत नाही. अगदी अल्पशिक्षित असणाऱ्या नेत्यांनी राज्याची धुरा यशस्वीपणे सांभाळल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र, लोकप्रतिनिधी शिक्षित असावा यासाठी अलीकडच्या काळात नागरिकांकडूनच आग्रह धरला जात आहे. त्यातच अहिल्यादेवीनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे-पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांना 'माझ्याएवढे इंग्रजीत बोलून दाखवावे, मी उमेदवारी अर्ज भरणार नाही असे आव्हान दिले होते. त्यामुळे राज्यात उमेदवारांच्या शिक्षणाचा प्रश्न चांगलाच चर्चिला जात आहे.
या पार्श्वभूमीवर कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या शिक्षणाचा धांडोळा घेतला असता दोन्ही मतदारसंघातील अधिकतर उमेदवार पदवीधर असल्याचे दिसून आले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात रिंगणात असलेल्या २३ उमेदवारांपैकी ८ उमेदवार पदवीधर तर २ उमेदवार पदव्युत्तर आहेत. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती हे पदवीधर तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजय मंडलिक हे पदव्युत्तर आहेत.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातही ७ उमेदवारांनी पदवी संपादित केली असून २ उमेदवार पदव्युत्तर आहेत. विशेष म्हणजे या मतदारसंघात चार उमेदवार दहावी तर ३ उमेदवार बारावी पास आहेत. या दोन्ही मतदारसंघातील बहुतांश उमेदवारांनी कला शाखेतूनच आपले शिक्षण पूर्ण केल्याचे दिसते.
शाहू छत्रपती यांची इंदूरमधून पदवी
शाहू छत्रपती हे बी.ए. असून त्यांनी इंदूर विद्यापीठातून पदवी घेतली आहे. प्रा. संजय मंडलिक हे शिवाजी विद्यापीठातून एम.ए.बी.एड आहेत. या मतदारसंघातील बाजीराव खाडे हे एम.एस्सी ॲग्री आहेत. हातकणंगलेमधून लढणारे सत्यजित पाटील-सरुडकर यांनी केरळ विद्यापीठातून बी.एस्सी ॲग्रीची पदवी मिळवली आहे. विशेष म्हणजे याच मतदारसंघातील अपक्ष लढणारे सत्यजित पाटील हे एम. ई. (सिव्हिल) आहेत. राजू शेट्टी हे बागणी हायस्कूलमधून दहावी उत्तीर्ण आहेत. तर धर्यशील माने यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बी.ए.पूर्ण केले आहे.
असे आहे दोन्ही मतदारसंघातील चित्र
शिक्षण - कोल्हापूर - हातकणंगले
पदव्युत्तर : - २ - २
पदवी : - ८ - ७
पदवी अर्धवट शिक्षण : - ३ - ४
बारावी : - ४ - ३
अकरावी : - ० - २
दहावी : - २ - ४
नववी : - ० - ३
आठवी : - ० - १
सातवी : - ३ - ०
आयटीआय : - ० - १