ब्रिटनहून आलेल्या ८ जणांचा पत्ता लागेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:32 AM2020-12-30T04:32:35+5:302020-12-30T04:32:35+5:30
कोल्हापूर : कोरोनाच्या नव्या स्वरूपातील विषाणूने ब्रिटनमध्ये कहर केला असताना तेथून कोल्हापूर जिल्ह्यात ६२ जण परतले आहेत. मात्र, त्यातील ...
कोल्हापूर : कोरोनाच्या नव्या स्वरूपातील विषाणूने ब्रिटनमध्ये कहर केला असताना तेथून कोल्हापूर जिल्ह्यात ६२ जण परतले आहेत. मात्र, त्यातील ८ जणांचा पत्ताच लागत नाही. त्यामुळे या सर्वांची माहिती घेण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.
डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या स्वरूपातील विषाणूची नागरिकांना मोठ्या प्रमाणावर लागण सुरू झाली. परिणामी भारत सरकारने तिकडून येणारी विमानसेवाही खंडित केली. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आलेल्या प्रवाशांचा आढावा घेतला असता जिल्ह्यात ६२ जण ब्रिटनहून परतल्याचे स्पष्ट झाले आहेत. या प्रवाशांची माहिती केंद्र आणि महाराष्ट्र शासनाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली. त्यानंतर या सर्व प्रवाशांची खातरजमा करण्यात आली.
मात्र, हातकणंगले तालुक्यात १० जण परतले असून त्यातील ७ जणांची अजूनही ठोस माहिती मिळत नाही तर करवीर तालुक्यातील तिघेजण आले असून त्यापैकी एकाचा ठावठिकाणा अजून लागलेला नाही. ज्यांची माहिती मिळाली आहे अशा ५४ जणांची आटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. या सर्वांना होमक्वारंटाईन राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
चौकट
ब्रिटनहून आलेले तालुकावार नागरिक
आजरा- ०२
भुदरगड-०४
चंदगड -०१
गडहिंग्लज -०१
हातकणंगले १०
कागल-०१
करवीर-०३
पन्हाळा -०३
शिरोळ-०४
कोल्हापूर महापालिका - ३३